भारतात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. लसीकरण सुरू झाले असले तरीदेखील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्राणघातक विषाणूचा संसर्ग आयपीएलच्या खेळाडूंना देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली कॅपिटल्स संघातील फिरकी गोलंदाज आर अश्विनने देखील कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने आपल्या वडिलांच्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.
आर अश्विनच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अश्विनच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबत बोलताना अश्विन म्हणाला, “मी आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त होतो. त्यामुळे माझ्या पत्नीने आणि आई वडिलांनी मला काहीच कळवले नव्हते. माझ्या मुलांना ३-४ दिवस ताप आला होता. माझ्या पत्नीने मला म्हटले होते की, तिने त्यांना औषध दिले होते परंतु त्यांना काहीच फरक जाणवला नव्हता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्या संपूर्ण कुटूंबाला कोरोनाची लागण झाली होती. माझ्या वडिलांना सुरुवातीच्या ५ दिवस जास्त त्रास जाणवला नाही. परंतु नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती, ती ८५ च्या खाली आली होती. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. डिस्चार्ज होऊनही बरेच दिवस त्यांच्या ऑक्सिजन पातळीत फरक जाणवला नव्हता. माझ्या वडिलांनी लसीकरणाचे दोन्हीही डोस घेतले होते. मी खात्रीने याबाबत सांगू शकतो की, त्यांनी लस घेतली होती म्हणूनच आम्ही त्यांना वाचवण्यास यशस्वी ठरलो.”
अश्विनने केली अपील
राज्य सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी देखील लसीकरण सुरू केले आहे. याबाबत अश्विन म्हणाला की, “या कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा एकमात्र उपाय म्हणजे लसीकरण आहे. याबाबतीत मला कुठलीही शंका नाहीये. त्यामुळे लसीकरण करून घ्या.”
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयची मोठी योजना, श्रीलंका दौऱ्यावर विराट आणि रोहितला ‘नो एंट्री’; जाणून घ्या कारण
भारत नव्हे तर ‘या’ देशात होणार आयपीएल २०२१चे उर्वरित सामने, बीसीसीआय अध्यक्षाने दिला इशारा