जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपुष्टात आला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून २७ खेळाडूला कायम ठेवले. या रिटेंशनमध्ये १६ कोटी रुपये घेत रोहित शर्मा, रिषभ पंत व रवींद्र जडेजा सर्वात महागडे खेळाडू बनले. मात्र, आज सर्वात महागडा ठरलेला जडेजा एकेकाळी चक्क आयपीएलमधून बॅन झाला होता.
काय होते प्रकरण?
विराट कोहलीच्या नेतृत्वातील युवा संघाने २००८ मध्ये मलेशिया येथे झालेला एकोणीस वर्षाखालील मुलांचा विश्वचषक जिंकला होता. त्याच वर्षी आयपीएलची मुहूर्तमेढ रोवली गेली. या संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजा याला राजस्थान रॉयल्स संघाने करारबद्ध केले. जडेजाने स्पर्धेचा पहिला आणि दुसरा हंगाम राजस्थानसाठी खेळला व शानदार कामगिरी केली.
जडेजाच्या अप्रतिम कामगिरीनंतर इतर संघांची नजर त्यावर पडणे साहजिक होते. आयपीएल २०१० पूर्वी मुंबई इंडियन्स संघाने जडेजाला आपल्या संघाकडून खेळण्याचा प्रस्ताव दिला. मुंबईच्या काही प्रतिनिधींनी याबाबत त्याच्याशी चर्चा केली. मात्र, याची कुणकुण राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापनाला लागल्यावर मोठे महानाट्य घडले. त्यांनी या गोष्टीची तक्रार आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे केली. नियमानुसार, कोणताही करारबद्ध खेळाडू इतर फ्रॅंचाईजींशी संघ बदलण्याबाबत चर्चा करू शकत नाही. जडेजा यानुसार दोषी ठरला व त्याला २०१० आयपीएल हंगामासाठी निलंबित करण्यात आले. जडेजा हा केवळ दोन वर्षे राजस्थानसाठी खेळू इच्छित होता. मात्र, त्याने याआधीच तीन वर्ष राजस्थानसाठी खेळण्याचा करार केलेला.
आता बनला सर रवींद्र जडेजा
सन २०१२ आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्स संघाने जवळपास १२ कोटी रुपयांची मोठी बोली लावत, जडेजाला आपल्या संघात सामील करून घेतले होते. तेव्हापासून तो चेन्नई आणि भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू म्हणून नावारूपास आला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात तो नेहमीच सरस कामगिरी करताना दिसतो. सीएसके संघ व्यवस्थापनाने आगामी आयपीएल हंगामापूर्वी त्याला धोनीआधी क्रमांक एकचा खेळाडू म्हणून रिटेन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्लुसनरने सोडली अफगाणिस्तानची साथ! आयपीएलमध्ये मिळणार प्रशिक्षणाची संधी?
क्रिकेटमधील राजामाणूस तो हाच! स्वत:च्या पगारात कपात करून धोनीने जडेजाला दिलं अव्वलस्थान
श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर