दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार आहेत. २०१९ विश्वचषकानंतर फिल सिमन्स यांच्या जागी लान्स क्लुसनर यांची निवड करण्यात आली होती. तेव्हा क्लुसनर म्हणाले होते की, यासाठी मी उत्साही आहे आणि मला सन्मानित केल्यासारखं मला वाटतंय.
अफगाणिस्तान संघासोबत क्लुसनर यांचा करार डिसेंबरमध्ये समाप्त होत आहे. आशियाई संघासोबत २ वर्ष घालवल्यानंतर त्यांनी आभार मानले आणि ते इतर संघांच्या प्रशिक्षकपदाच्या भूमिकेसाठी उत्सुक दिसत आहेत. आयपीएलच्या पुढील हंगामात ते कोणत्याही एका संघाचे प्रशिक्षक म्हणून दिसू शकतात.
अफगाणिस्तान संघाची साथ सोडण्यापूर्वी क्लुसनर काय म्हटले?
क्लुसनर यांनी २९ नोव्हेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, “या संघासोबत २ वर्षात काही अविस्मरणीय क्षण साजरे केले. मी अफगाणिस्तान संघ आणि क्रिकेटपासून दूर जाणार आहे. माझ्या प्रशिक्षकपदाच्या वाटचालीसाठी आणि पुढे मिळणाऱ्या संधीसाठी मी उत्सुक आहे.”
अफगाणिस्तानने क्लुसनर प्रशिक्षक असताना चांगले प्रदर्शन केले. त्यांनी एका कसोटी सामन्यात, ३ वनडे सामन्यात आणि ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवला. आयर्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका देखील जिंकल्या. अफगाणिस्तान संघ टी-० विश्वचषकामध्ये देखील खेळला. ते उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ नाही शकले. विश्वचषकात संघाचं प्रदर्शन खराब होते. सुपर १२ मध्ये संघ ५ पैकी फक्त २ सामन्यात विजय मिळवू शकला.
आपल्या क्रिकेट कारकीर्दीत क्लुसनर यांनी १९९६ ते २००४ दरम्यान ४९ कसोटी सामने आणि १७१ वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी कसोटीत १९०६ धावा आणि ८० विकेट्स तर वनडेत ३५७६ धावा आणि १९२ विकेट्स घेतल्या. क्लुसनरला इतिहासातला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते. १९९९ वनडे विश्वचषकात त्यांनी एकहाती दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य फेरीत नेण्याचा कारनामा करून दाखवला होता.