आशिया चषक 2022 मधील चौथा सामना भारत विरुद्ध हॉंगकॉंग असा रंगला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने हॉंगकॉंगचा 40 धावांनी पराभव करत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. सूर्यकुमार यादव व विराट कोहली हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्याचवेळी रवींद्र जडेजा याने एक बळी मिळवत आपल्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद केली.
भारतीय फलंदाजांनी या सामन्यात शानदार फलंदाजी करत 192 धावा धावफलकावर लावल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी करत संघाचा विजय साकार केला. रवींद्र जडेजा याने आपल्या 4 षटकात केवळ 15 धावा देत बाबर हयात याचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. यासोबतच त्याने आशिया चषकात भारतासाठी सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली.
रवींद्र जडेजा याच्या नावे आता आशिया चषकात 23 बळी झाले आहेत. त्याने इरफान पठाण याला मागे सोडले. इरफानने भारतासाठी यापूर्वी आशिया चषकात सर्वाधिक 22 बळी मिळवले होते. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचा क्रमांक लागतो. त्याने आत्तापर्यंत 18 बळी मिळवले आहेत. तर चौथ्या क्रमांकावर अनपेक्षितपणे सचिन तेंडुलकर याने 17 बळींसह कब्जा केला आहे. माजी भारतीय कर्णधार कपिल देव व अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार प्रत्येकी 15 बळींसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाने विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर हॉंगकॉंगसमोर 193 धावांचे मोठे लक्ष ठेवले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर हे आव्हान त्यांच्यासाठी अशक्यप्राय ठरले. भारताने त्यांना 5 बाद 152 धावांवर रोखत 40 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सुपर फोरमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे.