मुंबई। मंगळवारी (६ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. हा इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १३ वा सामना होता. या सामन्यात बेंगलोरने ४ विकेट्सने विजय मिळवला. हा विजय बेंगलोरसाठी खूप खास ठरला आहे. कारण, हा त्यांचा आयपीएलमधील १०० वा विजय होता.
विजयांचे शतक करणारा बेंगलोर चौथा
आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवणारा बेंगलोर चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम सध्या मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबईने १२५ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे मुंबई सर्वाधिक ५ आयपीएल विजेतेपद मिळवणारा संघ देखील आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांमध्ये मुंबई पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या आणि कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने ११७ विजय मिळवले आहेत आणि कोलकाताने १०९ विजय मिळवले आहेत. यानंतर आता चौथ्या क्रमांकावर बेंगलोरचे नाव आले आहे.
बेंगलोरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २१४ सामने खेळले आहेत. यातील १०० सामन्यात विजय मिळवले असून १०७ पराभव पत्करले आहेत. त्याचबरोबर ४ सामन्यांचा निकाल लागलेला नाही, तर २ सामने त्यांनी सुपर ओव्हरमध्ये जिंकले आहेत आणि १ सामना सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला आहे. (RCB becomes 4th team to win 100 IPL games)
बेंगलोरने जिंकला रोमांचक सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील (RCB vs RR) सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १६९ धावा केल्या आणि बेंगलोरसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानकडून जोस बटलरने ७० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच देवदत्त पडीक्कलने ३७ आणि शिमरॉन हेटमायरने ४२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बेंगलोरकडून डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
यानंतर १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून सलामीवीर फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर बेंगलोरची मधली फळी कोलमडली. पण, नंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी ६७ धावांची भागीदारी केली आणि विजयात मोलाचे योगदान दिले.
शाहबाज अहमद ४५ धावांवर बाद झाल्यानंतर कार्तिकने जबाबदारी सांभाळत बेंगलोरला विजय मिळवून दिला. कार्तिकने ७ चौकार आणि १ षटकारासह २३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. तसेच हर्षल पटेलने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विजयी षटकार खेचला. त्यामुळे बेंगलोरने १९.१ षटकात १७० धावांचे आव्हान पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! मोठ्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, वाढवली संघाची चिंता
‘त्यावेळी धोनीने ताहीरला काय सांगितले माहित नाही, पण माझा झेल गेला’, इशान किशनने सांगितला किस्सा
IPL 2022| राजस्थानला मोठा धक्का; संघातील ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू १५व्या हंगामातून बाहेर