आयपीएल आणि वाद हे समीकरण नित्याचच असतं. असा एकही सीझन जात नाही जिथं काहीतरी कांड घडत नाही. पहिल्या आयपीएलला भज्जीने श्रीसंतच्या कानाखाली अशी काही मारली जिचा आवाज बरेच दिवस घुमत राहिला. ही ग्राउंडवर घडणारी प्रकरण आयपीएलवाले सांभाळून घ्यायचे, पण २०१२ ला असं काही घडलं, ज्याच्यामुळे आयपीएलमध्ये पोलिसांची एन्ट्री झाली.
२०११-२०१२ चे सीझन म्हणजे ख्रिस गेलचे सिझन. २०११ला मध्यातून आलेल्या गेलने तुफान राडा घातला होता. पुढच्या वर्षी पण त्याचा फॉर्म तसाच राहिला. सिझन एंडला चाललेला आणि ६७ वी मॅच झाली दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर गेलच वादळ आलं आणि त्याने शतक ठोकलं. २१६चं टारगेट चेस करताना दिल्लीला दम लागला आणि ते २१ रनांनी हरले. दुसऱ्या दिवशी न्यूज पेपरमध्ये गेल्याची चर्चा होती गेलच्या शतकाची आणि टीव्हीवर आरसीबीसाठी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन ल्युक पॉमर्सबॅचची.
हेही पाहा- जेव्हा पहिल्यांदा आयपीएल क्रिकेटरला चढावी लागलेली पोलीस स्टेशनची पायरी
झोयल हमिद नावाच्या इंडो अमेरिकन महिलेने पॉमर्सबॅचवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला. पोलिसांनी पहाटेच पॉमर्सबॅचला उचलला. झोयलने आपल्या तक्रारीत म्हटलेले, “पॉमर्सबॅचने काल मॅचनंतर झालेल्या पार्टीत मला पकडले आणि माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. माझा फियान्से साहिल पीरजादाने त्याला अडवल्यावर त्याने त्याला मारहाण केली.”
सकाळी सकाळी टीव्ही चॅनल्सवर डिबेट सुरू झाल्या. बॅन आयपीएल सारखे शब्द पहिल्यांदा इथेच ऐकले गेले. कोणी झोयलची बाजू घेतली तर कोणी पॉमर्सबॅचची. आपल्या प्लेअरला डायरेक्ट पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावल्यामुळे, इकडे टीमचे ओनर विजय मल्ल्यांचे सुपुत्र सिद्धार्थ मल्ल्या संतापले. त्याने सरळ ट्वीट करत झोयलच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘ही महिला काल पार्टीत माझ्याकडेच बघत होती. तिला माझा बीबीएम पीन हवा होता. तो साहिल तिचा फियान्से नाहीच, आणि बरेच काही आक्षेपार्ह शब्द सिद्धार्थने लिहिले. मॅटर तापू लागलं.
दुसरीकडे पॉमर्सबॅचने आपल्यावर लावलेले आरोप नाकारले. तो मी नव्हेच असाच त्याचा अविर्भाव होता. इकडे बीसीसीआयची धाकधूक वाढलेली, कारण प्रकरण गंभीर होतं. पोलिसांनीही तपास टॉप स्पीडमध्ये नेला. ज्या हॉटेल मौर्यामध्ये हे घडलं तिथलं सीसीटीव्ही फुटेज पाहिले गेले पण हाती जास्त काही लागलं नाही. चार दिवसांनी पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं तपास लास्ट स्टेजला आलाय. आम्ही लवकरच चार्जशीट दाखल करणार आहोत.
रोज काही ना काहीतरी बातम्या येत राहिल्या. इतक्यात २५ मेला दोन्ही पक्षांकडून दिल्ली हायकोर्टात सांगितलं गेलं, ‘आम्ही सर्वजण तरुण आहोत आणि आणि आणखी खूप आयुष्य आमच्यासमोर आहे. आम्ही हे प्रकरण सामोपचाराने मिटवतोय.” इतका काथ्याकूट झाल्यानंतर प्रकरण मिटलं आणि सर्वांना हायस वाटल, पण पॉमर्सबॅचवर त्याच बिल फाटलं. त्याचा पासपोर्ट सस्पेंड झाला. सोबतच राहिलेल्या सिझनमधून त्याला नारळ दिला गेला. पोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं ते पहिल प्रकरण संपलं.
या सगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या पॉमर्सबॅचच्या बदनामीची ही पहिलीच वेळ नव्हती. २००९ ला आपल्या सल्लूभाईसारखं हिट & रन प्रकरण त्याच्यावर शेकलेलं. पुढे २०१४ ला डिप्रेशनच कारण देत तो रिटायर झाला. आता अगदी २०२१ मध्ये चोरी आणि ड्रग्सच्या प्रकरणात त्याला जेल झाली. आपल्या खेळापेक्षा बाकीच्या उचापतींसाठीच फेमस झालेल्या पॉमर्सबॅचने आयपीएलवाल्यांना पहिल्यांदा पोलिस स्टेशनची पायरी चढायला लावलेली.
या सगळ्या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे शेवटपर्यंत समजलं नाही, पण प्लेयर्स पार्टीत जायला घाबरू लागले. आयपीएलच्या पार्ट्या सुरू राहिल्या पण आधीसारखा तडका त्या पार्ट्यांमध्ये नसायचा. जे झालं ते झालं, पण खेळाडूंना एक चांगलाच धडा या पॉमर्सबॅच प्रकरणाने कायमचा मिळाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर