आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) मोठा चाहतावर्ग आहे. तरीही, आतापर्यंत या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. आरसीबीने तीन वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. परंतु ते ट्रॉफी उंचावू शकले नाहीत. यासोबतच अनेकदा हा संघ गुणतालिकेत तळाशी दिसून आला. ख्रिस गेल, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, केविन पीटरसन, जॅक कॅलिस आणि डेल स्टेन या दिग्गज खेळाडूंनी आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे. असे असतानाही हा संघ अद्याप आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ हा आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवण्यात कमी पडतो. एक-दोन हंगामातील खराब कामगिरीनंतर ते चांगल्या खेळाडूंना संघातून वगळतात. आज आम्ही तुम्हाला अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना लवकरच संघातून बाहेर काढण्याचा निर्णय आरसीबीने घेतला आणि त्याचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर झाला.
१) शेन वॉटसन
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू शेन वॉटसन २०१६ व २०१७ अशी दोन वर्ष आरसीबी संघाचा भाग होता. त्यापैकी २०१६ मध्ये आरसीबीने अखेरच्या वेळी आयपीएलच्या अंतिम सामना खेळलेला. वॉटसनने त्या दोन हंगामात मिळून २४ सामने खेळताना २५० धावा व २६ बळी मिळवले होते. मात्र, आरसीबी व्यवस्थापनाने पुढील हंगामासाठी त्याला आपल्या संघात स्थान दिले नाही आणि तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळू लागला.
वॉटसनने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना २०१८ आयपीएल हंगामात १५ सामन्यांमध्ये २ शतकांच्या मदतीने ५५५ धावा केल्या व चेन्नईला तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. २०१९ हंगामातही त्याने १७ सामने ३९८ धावा बनविल्या. एवढेच नव्हे तर त्याने पूर्ण आयपीएल कारकिर्दीत ४ शतके झळकावली आहे. त्यामुळे आरसीबीचा त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय चुकीचा होता हे लक्षात येते.
२) केएल राहुल
पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल २०१७ च्या आयपीएल हंगामापर्यंत आरसीबीच्या संघात होता. मात्र त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २०१८ मेगा लिलावापूर्वी सोडले होते. या निर्णयाची आरसीबीला मोठी किंमत मोजावी लागली. कारण त्यानंतर राहुलने पंजाब किंग्ससाठी खेळताना चांगली कामगिरी केली.
गेल्या तीन हंगामात तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने २०१८ च्या हंगामात ६५९ धावा, २०१९ च्या हंगामात ५९३ धावा आणि २०२० हंगामात ६७० धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. राहुल सध्या टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू बनला आहे. आरसीबीला सध्या एका चांगल्या सलामीवीराची गरज असताना, राहुलला सोडण्याचा आरसीबीचा निर्णय चुकल्याचे निदर्शनास येते.
३) मार्कस स्टॉयनिस
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस हा २०१९ आयपीएलवेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सदस्य होता. त्या हंगामात त्याने १० सामने खेळताना २११ धावा बनविल्या होत्या. मात्र, एकाच हंगामानंतर आरसीबीने त्याला करारमुक्त केले. २०२० आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. दिल्लीकडून १७ सामने खेळताना त्याने ३५२ धावा व १३ बळी आपल्या नावे करत दिल्लीला प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे आरसीबीने स्टॉयनिसला बाहेर काढण्यास घाई केल्याचे स्पष्ट होते.
महत्त्वाच्या बातम्या-