जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उर्वरित भागाला सुरूवात होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्व संघांनी या हंगामासाठी उपलब्ध राहू न शकणाऱ्या खेळाडूंच्या जागी इतर खेळाडू करारबद्ध करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने तब्बल तीन नव्या खेळाडूंना आपल्या संघात सामील केले.
या खेळाडूंनी घेतली माघार
कोरोना महामारीमुळे आयपीएलचा चौदावा हंगाम मे महिन्यात अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. आता हा हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे १९ सप्टेंबरपासून खेळला जाईल. या हंगामापूर्वी आरसीबीचा भाग असलेल्या अष्टपैलू डॅनियल सॅम्स, वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन व फिरकीपटू ऍडम झंपा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे आरसीबी संघ व्यवस्थापन नव्या खेळाडूंचा शोध घेत होते.
या तिघांना मिळाली संधी
रिचर्डसन, सॅम्स व झंपा यांच्या जागी करारबद्ध केलेल्या तीन नव्या खेळाडूंची आरसीबीने पत्रकार परिषदेत घोषणा केली. यामध्ये श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा, वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा व सिंगापूरचा आक्रमक फलंदाज टिम डेव्हिड यांना संधी मिळाली. हे तिन्ही खेळाडू प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. चमिरा २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. मात्र, त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
चांगल्या कामगिरीचे मिळालेले बक्षीस
भारतीय संघाचे नुकताच श्रीलंका दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये हसरंगाने आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजांना चांगलेच त्रस्त केलेले. तर, चमिरा याने आपल्या वेगवान व आखूड टप्प्याच्या चेंडूंनी सर्वांना प्रभावित केले होते. सिंगापूरसाठी राष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या डेव्हिड याने काउंटी स्पर्धेत सरेसाठी नुकतेच शतक झळकावले आहे. तो द हंड्रेड लीगमध्ये सदर्न ब्रेव संघासाठी महत्त्वाचा फलंदाज म्हणून समोर आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
गांजा पिल्याने गावसकरांच्या मित्राचे झालेले निलंबन, केले होते अविस्मरणीय पुनरागमन
आयपीएलमधील संघांना बसणार मोठा धक्का! कमिन्ससह ‘हे’ चार ऑसी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकणार
‘असली पिक्चर बाकी है’, उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी आलेला धोनीचा व्हिडिओ तुुफान व्हायरल