शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात रविवारी (३ ऑक्टोबर) डबर हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघातील सामना झाला. शेख जायेद स्टेडियमवरवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह बेंगलोरने प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे.
या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६४ धावा केल्या आणि पंजाब किंग्सला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकांत ६ बाद १५८ धावाच करता आल्या.
पंजाबकडून १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांची जोडी उतरली. या दोघांनी नेहमीप्रमाणे संघाला दमदार सुरुवात दिली. या दोघांनी तब्बल ९१ धावांची सलामी दिली. हे दोघ खेळपट्टीवर स्थिरवाले असतानाच केएल राहुलला ९१ धावांवर शाहबाज अहमदने बाद केले. केएल राहुल ११ व्या षटकात ३९ धावांवर बाद झाला. दरम्यान मयंक अगरवालने त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
पण, राहुल बाद झाल्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. निकोलस पूरन १३ व्या षटकात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर १६ व्या षटकार मयंकला चहलने मोहम्मद सिराज करवी झेलबाद केले. मयंकने ४२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारासह ५७ धावांची खेळी केली. याच षटकात चहलने सर्फराज खानला शून्य धावेवर त्रिफळाचीत केले.
एडेन मार्करन चांगला खेळत होता. पण तो २० धावांवर जॉर्ज गार्टनच्या गोलंदाजीवर १७ व्या षटकात बाद झाला. यानंतर मोझेस हेन्रीक्स आणि शाहरुख खानने पंजाबला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांनाही अपयश आले. अखेरच्या षटकात शाहरुख धावबाद झाला. त्याने १६ धावा केल्या. तर हेन्रीक्स १२ धावांवर आणि हरप्रीत ब्रार ३ धावावंर नाबाद राहिला.
मॅक्सवेलचे अर्धशतक
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण ही भागीदारी तोडण्यात मोझेस हेन्रीक्सला यश आले. त्याने विराटला १० व्या षटकात २५ धावांवर त्रिफळाची केले. त्यामुळे विराट आणि पडीक्कलची ६८ धावांची भागीदारी तुटली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर हेन्रीक्सने डॅनियल क्रिश्चियनला देखील बाद केले.
यानंतर पडीक्कलने ग्लेन मॅक्सवेलसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पडीक्कल १२ व्या षटकात ४० धावांवर हेन्रीक्सच्याच गोलंदाजीवर बाद झाला. पण यानंतर मॅक्सवेलने एबी डिव्हिलियर्ससह बेंगलोरला सावरले. या दोघांनी ७३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे बेंगलोरने १४० धावांचा टप्पा सहज ओलांडला. पण डिव्हिलियर्स १९ व्या षटकात २३ धावांवर धावबाद झाला. दरम्यान, मॅक्सवेलने त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
पण, २० व्या षटकात मॅक्सवेल, शाहबाज अहमद आणि जॉर्ज गार्टन यांना मोहम्मद शमीने बाद केले. मॅक्सवेलने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. शाहबाजने ८ धावा केल्या. तर गार्टन भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे बेंगलोरच्या २० षटकात ७ बाद १६४ धावा झाल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मोझेस हेन्रीक्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
असे आहेत दोन्ही संघ
बेंगलोरने अंतिम ११ जणांच्या संघात बदल केलेला नाही. तर पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघात ३ बदल केले आहेत. दुखापतग्रस्त फॅबिएन ऍलेनऐवजी हरप्रीत ब्रारला, दीपक हुडा ऐवजी सर्फराज खानला, तर मोझेस हेन्रीक्सला नॅथन एलिसऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
पंजाब किंग्ज: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयंक अरगवाल, एडेन मार्करम, निकोलस पूरन, सरफराज खान, शाहरुख खान, मोझेस हेन्रिक्स, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल क्रिश्चियन, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.