भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका या दोन संघात खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा मुख्य अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की, तो येणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसून येणार नाही. तरीदेखील या मालिकेत इंग्लंडला त्याची कमी भासणार नाही, अशी शक्यता आहे. कारण, इंग्लंडकडे त्याचे पर्याय म्हणून काही खेळाडू उपलब्ध आहेत. आज आपण याच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) सॅम करन-
बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत त्याचा सर्वात मोठा पर्याय म्हणून सॅम करनकडे पाहिले जात आहे. स्टॉक्सच्या जागी त्याला संधी मिळणे जवळपास नक्की झाले असून, तो सलग दुसऱ्या दौऱ्यावर भारताविरुद्ध खेळेल. भारतीय संघाने २०१८ मध्ये केलेल्या दौऱ्यावर करनने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यावेळी देखील स्टोक्स दुखापतग्रस्त असल्याने करनला पहिल्या सामन्यासाठी संघात सामील केले गेलेले व तो या सामन्यात सामनावीर ठरलेला.
त्यावेळी करनने संपूर्ण मालिकेत ३८.८६ च्या उत्कृष्ट सरासरीने २७२ धावा केल्या होत्या. तसेच, ११ बळी आपल्या नावे केले होते. अशाच प्रकारची कामगिरी यावेळीही इंग्लंड संघ करनकडून अपेक्षित करत आहे.
२) क्रेग ओव्हरटन-
बेन स्टोक्सने भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) त्याचा बदली खेळाडू म्हणून अष्टपैलू क्रेग ओव्हरटनला संघात स्थान दिले आहे. त्याची अष्टपैलू क्षमता पाहता तोदेखील अंतिम अकरामध्ये संधी मिळाल्यास उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. २७ वर्षीय ओव्हरटनने १०२ प्रथमश्रेणी सामने खेळताना १३ अर्धशतकांच्या मदतीने २,८७१ धावा बनवलेल्या आहेत. तसेच, ३५९ बळी मिळविण्यात देखील तो यशस्वी ठरला आहे.
३)ओली रॉबिन्सन-
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केल्यानंतर एका सामन्यातच बंदीला सामोरा गेलेला वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन हादेखील अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. रॉबिन्सनने लॉर्ड्स येथील आपल्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून ७ बळी मिळवले होते. तसेच, पहिल्या डावात फलंदाजी करताना ४२ धावा देखील फटकावलेल्या. सध्या २७ वर्षाचा असलेला ओली रॉबिन्सनने २०१३ मध्ये यॉर्कशायरसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केल्यानंतर पुढील वर्षी हॅम्पशायरचेही प्रतिनिधित्व केले. २०१५ पासून तो ससेक्स संघाचा भाग आहे. त्याने आत्तापर्यंत ६४ प्रथमश्रेणी सामने खेळताना २८६ बळी मिळवले आहे. सोबतच त्याच्या नावे १ शतक व ७ अर्धशतके देखील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“जे पंतने केले ते गांगुलीनेही कधी केले नव्हते”, जेम्स अँडरसन झाला प्रभावित
पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर
इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात ‘असा’ असेल भारतीय वेगवान मारा, विश्वविजेत्या खेळाडूचे मत