टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्यामुळे पुढील मुख्य प्रशिक्षक कोण? अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. राहुल द्रविड यांचे नाव सर्वात पुढे असताना बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला देखील संपर्क केल्याची बातमी समोर येत आहे.
रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर भविष्यातील मुख्य प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविड यांचे नाव सर्वात पुढे आहे. तसेच सध्या माध्यमांतील वृत्तानुसार बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याला देखील मुख्य प्रशिक्षक पदाची ऑफर दिली होती. परंतु त्याने ही ऑफर फेटाळून लावली आहे.
रिकी पाँटिंग सध्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडतोय. गेली ३ वर्ष त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, रिकी पाँटिंगने नकार का दिला याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाहीये.
एका सूत्राने दिलेल्या माहितीत म्हटले की, “राहुल द्रविड हे एकमेव आदर्श उमेदवार होते. त्यांना असे करण्यास प्रवृत्त करणे आमच्यासाठी मोठे आव्हान होते. खरं सांगू, दुसरा पर्याय नाही.”
रिकी पाँटिंगने १९९५ मध्ये पदार्पण केले होते. तर राहुल द्रविडने १९९६ मध्ये पदार्पण केले होते. दोघांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रिकी पाँटिंगने ७१ शतकांसह २७,४८३ धावा केल्या होत्या. तर राहुल द्रविडनेही ४८ शतकांसह २४ हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
राहुल द्रविड यापूर्वी मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारण्यासाठी तयार नव्हते, परंतु बीसीसीआयने जोर दिल्यानंतर त्यांनी होकार दिला असल्याची चर्चा आहे. राहुल द्रविड यांनी भारतीय १९ वर्षाखालील संघाला आणि इंडिया ए संघाला प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडू घडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Photo: धोनीची टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियान एन्ट्री! बीसीसीआयने ‘किंग’ म्हणत केले ‘ग्रँड वेलकम’
युजवेंद्र चहलचं कारण आणि युवराज सिंगला अटक! पण रोहित शर्माचेही ‘प्रकरणात नाव’, वाचा अधिक
युवराज सिंगला पोलिसांकडून अटक, कारण आहे युजवेंद्र चहल! वाचा संपूर्ण प्रकरण