मुंबई। दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३२ व्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध ९ विकेट्स आणि ५७ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. दिल्लीसाठी हा विजय खास ठरला, कारण संघात या सामन्यापूर्वी ६ कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली होती. त्यामुळे सामन्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण, सामन्यापूर्वी अन्य सदस्यांचे कोरोना चाचणी अहवाल दोन वेळा निगेटिव्ह आल्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने संघाला महत्त्वाचा गुरुमंत्र दिला होता, ज्याचा फायदा संघाला झाल्याचे दिसले.
संघात कोरोना प्रकरणे (Covid-19 Positive Cases) आढळल्याने दिल्लीच्या (Delhi Capitals) खेळाडूंसह अन्य सदस्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले होते. याचा परिणाम सरावावरही झाला होता. त्याचमुळे खेळाडू वैतागलेले देखील होते. याबद्दल पाँटिंगनेच खुलासा केला.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, ‘कोरोनामुळे आमच्यावर थोडा परिणाम झाला होता. सराव सत्रही मागे राहिले. पण मी खेळाडूंना दोन गोष्टी सांगितल्या, एक, या गोष्टींना सकारात्मकतेने घ्या आणि दुसरी, असे समजा की, ही एक मोठी स्पर्धा आणि आणि आपण एका महान फ्रँचायझीचा एक भाग आहोत.’
तसेच संघाच्या प्रदर्शनाबद्दल पाँटिंग म्हणाला, ‘एक-दोन षटके सोडली, तर संघाची कामगिरी चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत आणि मुस्तफिजूर रेहमान अशा सर्वांनी चांगली कामगिरी केली. आमच्या तयारीत थोडा अडथळा आला, पण आम्ही याबद्दल जास्त चर्चा करत नाही. आमचे पूर्ण लक्ष चांगले खेळण्यावर आहे.’
अक्षर पटेलकडूनही पाँटिंगचे कौतुक
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) याने देखील पाँटिंगच्या सल्ल्याचा फायदा झाल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही क्वारंटाईन होतो. त्यानंतर आम्ही दोन-तीन दिवस सराव केला. पाँटिंगने आम्हाला सांगितले की, दोन पर्याय आहेत, एक आपल्याला सामना खेळावा लागेल. आपल्या संघास पॉझिटिव्ह प्रकरणे सापडली आहेत, आणि तयारीही चांगली झालेली नाही. किंवा तुम्ही असा विचार करू शकता की, बाहेरच्या गोष्टी आपल्या हातात नाही आणि तुम्ही प्रयत्न आणि तयारी याबाबत वचनबद्धता दाखवली पाहिजे.’
तो पुढे म्हणाला, ‘आम्ही सामन्यावर लक्ष्य केंद्रीत केले आणि आम्ही आमच्या योजना आखल्या. हेच सर्व होते आणि हेच त्याने सांगितले. आमची हीच मानसिकता होती.’
दिल्लीचा तिसरा विजय
या सामन्यात दिल्लीच्या (DC vs PBKS) गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे पंजाबला २० षटकांत सर्वबाद ११५ धावाच करता आल्या होत्या. त्याच्याकडून जितेश शर्माने सर्वाधिक ३२ धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, ललीत यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ११६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीने केवळ पृथ्वी शॉ याची ४१ धावांवर विकेट गमावली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने नाबाद ६० धावा केल्या, तर सर्फराज खान १२ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे १०.३ षटकांत दिल्लीने ११६ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सचे खेळाडू मधमाशांसमोर हतबल, सरावादरम्यान झोपावं लागलं मैदानात, Video व्हायरल
दिल्ली संघात कोरोनाचा फैलाव होण्यास डॉक्टर कारणीभूत? ‘या’ कारणाने निर्माण झाले प्रश्न
जिंकलस भावा! कुलदीपने सामनावीर पुरस्कार केला अक्षर पटेलबरोबर शेअर, कारणही सांगितलं





