टीम इंडियाच्या सर्वोत्तम फिनीशर पैकी एक असलेल्या रिंकू सिंहला टी20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळालेलं नाही. रिंकू सिंहनं त्याच्या छोट्याच्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या आयपीएलपूर्वी रिंकू सिंहच्या नावाची चर्चा होती की तो वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग असेल. परंतु केकेआरच्या व्यवस्थापनानं आयपीएलमध्ये रिंकू सिंहबाबत कोणतंही विशेष नियोजन केलं नाही. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये रिंकूची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. ज्याचा परिणाम, असा झाला की, रिंकू सिंहला भारतीय संघामधील आपलं स्थान गमवावं लागलं.
माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर सध्या केकेआरचा मार्गदर्शक आहे. गंभीरनं यावर्षी रिंकू सिंहला अनेक वेळा 7व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. या क्रमांकावर त्यानं यापूर्वी कधी फलंदाजी केलेली नाही. याशिवाय गौतम गंभीरनं केकेआरमध्ये येताच सुनील नारायणला सलामीला पाठवलं. नारायण सलामीला आल्यापासून तुफान फलंदाजी करतोय. ज्यामुळे रिंकू सिंहला अनेक सामन्यांमध्ये फलंदाजीची संधीच मिळाली नाही.
रिंकू सिंहच्या घसरत्या फलंदाजीच्या आलेखाला आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली, ती म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम. या नियमाचा वापर करून केकेआरनं अंगक्रिश रघुवंशीसारख्या फलंदाजांना रिंकू सिंहच्या आधी फलंदाजीला पाठवलं. यामुळे रिंकूला फलंदाजीची फारशी संधी मिळालीच नाही. हे कारण बीसीसीआयच्या सूत्रांनी देखील मान्य केलं आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, रिंकू सिंह आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा बळी ठरला आहे.
रिंकू सिंहला भारताच्या 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नसलं तरी त्याच्यासाठी विश्वचषकाचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. संघ व्यवस्थापनानं रिंकूला राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवलं आहे. 25 मे पूर्वी मुख्य संघातील कोणताही खेळाडू फॉर्ममध्ये नसेल किंवा दुखापतग्रस्त असेल तर रिंकूला त्याच्या जागी संघात संधी दिली जाऊ शकते. यासाठी रिंकूला आगामी सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
रिंकू सिंहच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झालं तर त्यानं टीम इंडियासाठी भरपूर धावा केल्या आहेत. रिंकू सिंहनं आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 89.00 ची सरासरी आणि 176.2 च्या स्ट्राइक रेटनं 356 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं 2 अर्धशतकंही झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टीम इंडियाची निवड? स्पर्धेत ठसा उमटवणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंची लागली लॉटरी
केएल राहुलचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडलाही संधी नाही
कमबॅक असावा तर असा! 17 महिन्यांनंतर मैदानावर परतताच रिषभ पंतला थेट वर्ल्ड कपमध्ये संधी!