---Advertisement---

रिषभ पंत अडचणीत? ICC कडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता!

On: सोमवार, जून 23, 2025 12:45 PM
---Advertisement---

भारताचा उपकर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत अडचणीत सापडला आहे. लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने अंपायर पॉल रीफेल यांच्याशी वाद घातल्याने ICC च्या आचारसंहितेअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. पंतवर दंडासोबतच बंदीची कारवाई होऊ शकते.

ही घटना इंग्लंडच्या डावातील 61व्या षटकात घडली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर हैरी ब्रूकने चौकार मारल्यानंतर पंत चेंडू घेऊन अंपायरकडे गेला आणि चेंडू बदलण्याची मागणी केली. अंपायरने चेंडू तपासला मात्र कोणतीही अडचण न आढळल्याने चेंडू न बदलण्याचा निर्णय दिला. त्यानंतरही पंत आग्रह धरत राहिला. अखेर नाराज होऊन पंतने चेंडू रागाने जमिनीवर आपटला. हे वर्तन ना अंपायरला ना मैदानात उपस्थित प्रेक्षकांना रुचले.

ICC च्या आचारसंहितेच्या कलम 2.8 नुसार, अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे ही लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 ची शिस्तभंगाची कारवाई मानली जाते. तसंच, कलम 2.9 मध्ये ‘अंपायरकडे किंवा त्याच्या आसपास चेंडू फेकणे किंवा फेकल्यासारखे वर्तन’ निषिद्ध मानले जाते. या दोन्ही कलमांतर्गत कारवाई झाल्यास दंडासह निलंबनाची शक्यता आहे.

दरम्यान, लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि रिषभ पंत यांनी शतकी खेळी केली. इंग्लंडनेही चांगला प्रतिकार करत 465 धावा केल्या. ओली पोपने 106 धावांची खेळी केली तर हैरी ब्रूक केवळ 1 धावेने शतक गमावले. जसप्रीत बुमराहने 5 बळी घेतले. भारत दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 90 धावांवर खेळत असून शुबमन गिल 6 आणि केएल राहुल 47 धावांवर नाबाद आहेत. चौथा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---