येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र या हंगामापूर्वीच गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. तो धक्का म्हणजे त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने या हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठी दिल्लीने २३ वर्षीय रिषभ पंतवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. पंतवर ही जबाबदारी आल्याने त्याच्या नावावर आता एक मोठा विक्रम होणार आहे.
दिल्लीला या हंगामातील पहिला सामना ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १० एप्रिलला खेळायचा आहे. त्यामुळे रिषभ पंत समोर पहिलेच आव्हान हे एमएस धोनी कर्णधार असलेल्या संघाचे असणार आहे. या सामन्याच्या दिवशी रिषभ पंतचे वय २३ वर्षे १८८ दिवस इतके असेल.
त्याचमुळे तो आयपीएलमध्ये नेतृत्व करणारा पाचव्या क्रमांकाचा सर्वात युवा कर्णधार ठरणार आहे. सध्या आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तो २२ वर्षे १८७ दिवस इतके वय असताना पहिल्यांदा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये खेळला होता. त्याच्या पाठोपाठ स्टिव्ह स्मिख, सुरेश रैना आणि श्रेयस अय्यर आहे. आता या यादीत पाचव्या क्रमांकावर रिषभचा समावेश होईल.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात नेतृत्त्व केलेले खेळाडू –
२२ वर्षे १८७ दिवस – विराट कोहली
२२ वर्षे ३४४ दिवस – स्टिव्ह स्मिथ
२३ वर्षे ११२ दिवस – सुरेश रैना
२३ वर्षे १४१ दिवस – श्रेयस अय्यर
२३ वर्षे १८८ दिवस – रिषभ पंत (१० एप्रिलला चेन्नई विरुद्धच्या सामन्याच्या दिवशीचे वय)
रिषभची आयपीएलमधील कामगिरी
रिषभ २०१६ हंगामापासून दिल्ली संघाचा भाग आहे. आत्तापर्यंत त्याने ६८ आयपीएल सामने खेळले असून ३५.२३ च्या सरासरीने १ शतक आणि २० अर्धशतकांसह २०७९ धावा केल्या आहेत.
दिल्ली संघाची मोहिम मुंबईतून
आयपीएल २०२१ चे आयोजन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने ते थोडे वेगळ्याप्रकारे करण्यात आले आहे. यंदा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळाच प्रवास करेल अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संघ यंदा आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची यंदाची मोहित मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून सुरु होत आहे. साखळी फेरीत दिल्लीला चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यासह पहिले ३ सामने मुंबईत खेळायचे आहेत. त्यानंतर २ सामने चेन्नईमध्ये, ४ सामने अहमदाबादमध्ये आणि ५ सामने कोलकातामध्ये खेळायचे आहेत.
दिल्लीचा आयपीएल २०२१ साठी संघ –
रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स, एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे, टॉम करन, स्टिवन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन हुसेन मेरिवाला, एम सिद्धार्थ.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या २३ व्या वर्षी आयपीएलमध्ये नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…
‘या’ कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज करेल संघर्ष, भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत
वसीम अक्रमचे अंतवस्त्रातील फोटो झाले व्हायरल, पत्नीने ट्रोल करत विचारले, “हे सामान्य आहे का?”






