दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सांभाळणारा कर्णधार केएल राहुल आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले. त्यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून सध्यातरी कुणालाच घेतले नाही. मात्र, संघाची धुरा आता रिषभ पंत याच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता पंत त्याच्या नेतृत्वात कोणाला संघात स्थान देणार याकडे लक्ष लागले आहे.
केएल राहुल बाहेर पडल्याने भारतासाठी सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी कोण येणार हा प्रश्न समोर आहे. यासाठी भारताकडे इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर हे तीन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये ऋतुराज आणि इशान संघात सलामीवीर म्हणून खेळू शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानंतर मधल्या फळीची धुरा सांभाळण्यासाठी स्वत: कर्णधार रिषभ पंत सोबत श्रेयस अय्यर आणि दिनेश कार्तिक खेळताना दिसू शकतात. विराट कोहलीला विश्रांती दिल्याने संघात तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी कोणता फलंदाज योग्य आहे यावर अनेक चर्चा झाल्या. यावर शेवटी श्रेयस अय्यरचे नाव अनेकांकडून घेतले जात आहे. याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या दिनेश कार्तिकलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय अष्टपैलू खेळाडूंमध्ये सर्वात पुढे नुकत्याच आयपीएल विजया संघ गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि केएल राहुलच्या गैरहजेरित संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याचा समावेश आहे. सोबतंच फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश होऊ शकतो. केएल राहुलसेह फिरकीपटू कुलदीप यादवही मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याच्याजागी अक्षर पटेलला खेळण्याची संधी मिळू शकते. सोबतच संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अमरान मलिक यांचा समावेश केला जाऊ शकतो.
दरम्यान, भारताने आपला पहिली आंतरराष्ट्रीय टी२० सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००६ साली खेळला होता. त्यावेळी संघाचे नेतृत्व विरेंद्र सेहवागकडे होते. त्यानंतर आजवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात एकूण १५ टी२० सामने झाले आहेत, यातील ९ सामन्यांत भारताने तर ६ सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. मात्र, भारत आजवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकही मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे आता भारत्ला इतिहास बदलण्याची संधी उपलब्ध आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धडाकेबाज क्रिकेटपटू असूनही ‘दारूडा’ म्हणून ओळखला जाणारा एँड्र्यू सायमंड्स
करण शर्माची ‘कर्णधार’ खेळी, उत्तर प्रदेशची कर्नाटकवर ५ विकेट्सने मात; सेमी फायनलमध्येही प्रवेश