भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आज, 11 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. तथापि, मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने रविवारी याची पुष्टी केली.
पंतला मालिकेतून वगळण्याची घोषणा करण्यासोबतच, बीसीसीआयने बदली खेळाडूची घोषणा केली आहे. संघात पंतच्या जागी संजू सॅमसन किंवा ईशान किशन नसून, विजय हजारे ट्रॉफीमध्ये कहर करणाऱ्या ध्रुव जुरेलला संघात घेण्यात आले आहे. जुरेलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटने कहर केला आहे; तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे.
पंतच्या दुखापतीचा खुलासा करताना बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की, “शनिवारी दुपारी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर भारताच्या सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करताना यष्टीरक्षक पंतला अचानक उजव्या पोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवू लागल्या.
त्याला ताबडतोब एमआरआय स्कॅनसाठी नेण्यात आले आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने त्याच्या क्लिनिकल आणि रेडिओलॉजिकल अहवालांवर एका तज्ञाशी सविस्तर चर्चा केली. पंतला साइड स्ट्रेन असल्याचे निदान झाले आहे आणि त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
पुरुष निवड समितीने पंतच्या जागी ध्रुव जुरेलला संघात स्थान दिले आहे आणि जुरेल संघात सामील झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा अपडेटेड एकदिवसीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).






