आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (5 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावण्याच्या इराद्याने उतरले. मात्र, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर 9 गड्यांनी पराभूत केले. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. राजस्थानने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पुन्हा एकदा रियान पराग यला संधी दिली. मात्र, तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र, केवळ 63 धावांवर चार बळी गमावल्यानंतर त्यांनी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून रियान पराग याला मैदानात उतरवले. त्याच्याकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो 6 चेंडूवर 4 धावा करून बाद झाला.
मागील पाच वर्षापासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेल्या रियान याला या हंगामात सहाव्यांदा संधी मिळाली होती. मात्र, यामध्ये तो केवळ एकदाच वीस धावांचा आकडा पार करू शकला आहे. 6 सामन्यांमध्ये तो केवळ 58 धावा करू शकला. त्याचा स्ट्राइक रेट देखील 108 असा खराब राहिलाय. मागील वर्षी राजस्थानने त्याला तब्बल 3 कोटी 80 लाखांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतलेले.
त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो पूर्णतः अपयशी ठरला असल्याचे दिसून येते. 2019 मध्ये आयपीएल पदार्पण करणाऱ्या पराग याने 53 सामने खेळताना 580 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 16.11 अशी खराब राहिली आहे. तसेच तो केवळ तीन अर्धशतके झळकावू शकला. याव्यतिरिक्त गोलंदाजीतही त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
(Riyan Parag Flop Show Continue In IPL 2023 For Rajasthan Royals)