आयपीएल २०२१ च्या ३२ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर निसटता विजय मिळवला. संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सने मिळवलेल्या विजयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, कार्तिक त्यागीच्या २० व्या षटकापूर्वी १९ व्या षटकात त्याने मुस्तफिजुर रहमानला महत्त्वपूर्ण सल्ला दिला जो खूप प्रभावी ठरला.
मंगळवारी(२१ सप्टेंबर) खेळवलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंजाब किंग्जचा २ धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० षटकांत १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळणारे पंजाब किंग्स अधिक चांगल्या स्थितीत होते. त्यांना शेवटच्या १२ चेंडूत ८ धावांची गरज होती.
पण, मुस्तफिजुर रहमानने त्याच्या १९ व्या षटकात फक्त ४ धावा दिल्या. यानंतर कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने या षटकात फक्त एक धाव देऊन दोन विकेट्स घेतल्या आणि शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला.
राजस्थान रॉयल्सच्या दृष्टीने, १९ वे षटक खूप महत्वाचे होते. कारण त्या षटकात जास्त धावा झाल्या असत्या, तर शेवटच्या षटकात त्याचा बचाव करणे खूप कठीण झाले असते. त्याचवेळी, संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने १९ व्या षटकासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. १९ व्या षटकात मुस्तफिजुर रहमानला त्याने एक सल्ला दिला होता.
रियान पराग सामन्यानंतर म्हणाला, ‘क्रिकेट हा खरोखर एक मजेदार खेळ आहे. पहिल्या डावानंतर आम्ही पुढे होतो, पण खराब क्षेत्ररक्षणामुळे सामना आमच्यापासून दूर गेला होता. १९ व्या षटकात, मी मिड-ऑफवर उभा होतो आणि मुस्तफिजुर रहमानला सांगितले की, या षटकात सामना संपू देऊ नको. कार्तिक त्यागी २० वे षटक टाकेल आणि आपल्याला जिंकण्याची एक संधी मिळेल.’
रियान परागने कार्तिक त्यागीच्या शेवटच्या ओव्हरवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ‘हे आतापर्यंतच्या सर्वोत्तम षटकांपैकी एक आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मी यापेक्षा चांगला स्पेल कधीही पाहिलेला नाही. येत्या सामन्यांमध्ये तो अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे. मुस्तफिजूर आणि त्यागीने शानदार गोलंदाजी केली. शेवटच्या दोन षटकांत आठ धावा वाचवणे हे विलक्षण आहे. अशी कामगिरी खूप क्वचितच होत असते.’
महत्त्वाच्या बातम्या –
कार्तिक त्यागीच्या ‘ऐतिहासिक’ षटकामागील ‘ऑस्ट्रेलियन कनेक्शन’
‘युनिवर्स बॉस’ गेलच्या नावावर आहेत आयपीएलचे ‘हे’ ५ मोठे विक्रम, ज्यांना मोडीत काढणे महाकठीण
निवृत्तीनंतरही वादात अडकला मार्लेन सॅम्युअल्स; आयसीसीने लावले गंभीर आरोप; होऊ शकते मोठी कारवाई