‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनतर खूप कमी वेळेस तो मैदानात खेळायला उतरला आहे. अशातच मास्टर ब्लास्टर सचिनला लाईव्ह खेळताना पाहायची संधी मिळत असेल, तर ती कोणीही सोडणार नाही. आता अवघे ५० रुपयांचे तिकीट काढून सचिनला लाईव्ह खेळताना पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेत सचिनसह ब्रायन लारा, ब्रेट ली, विरेंद्र सेहवाग असे अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. यात भारतीय संघासोबत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे तिकीट विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. ५० रुपये पासून ते ५०० रुपयांपर्यंत तिकिटे उपलब्ध आहेत. येत्या २३ फेब्रुवारीपासून तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू २५ फेब्रुवारीपर्यंत जयपूरमध्ये दाखल होतील. त्यानंतर त्यांना बायो बबलमध्ये राहावे लागणार आहे. या स्पर्धेची सुरुवात २ मार्च रोजी होणार असून अंतिम सामना २१ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. यादरम्यान सर्व संघांमध्ये एकूण १५ सामने खेळवले जातील. संध्याकाळी ७ वाजता या सामन्यांची सुरुवात होईल.
कोरोनामुळे ४ सामन्यानंतर थांबवण्यात आली मालिका
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या या हंगामाची २०२० मध्ये सुरुवात करण्यात आली होती. परंतु अवघे ४ सामने झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने जयपूर मध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. यात सचिन तेंडुलकरसह विरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, मुथैया मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, चामिंडा वास, युवराज सिंह, जहीर खान, ब्रेट ली, जोंटी रोड्स, लांस क्लूजनर हे खेळाडू या स्पर्धेचा भाग असणार आहेत.
आनंदाची बाब म्हणजे, या स्पर्धेचा आनंद प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन घेता येणार आहे. ६५ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये २५ हजार लोकांना प्रत्यक्षात जाऊन सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! आयपीएल २०२१चे साखळी फेरी सामने होणार महाराष्ट्राच्या राजधानीत, तर प्लेऑफ ‘या’ शहरात?
चेन्नईच्या अनुभवी शिलेदाराला खरेदी करत सहाव्यांदा जेतेपद जिंकण्यास तयार; पाहा रोहितची नवी पलटण
नक्की १५ कोटी म्हणजे किती रे भावा? आरसीबीने खरेदी केलेल्या जेमिसनला लिलावानंतर पडला प्रश्न