भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने भारतीय संघाच्या संभावित भावी कर्णधारांबद्दल आपले मत मांडले आहे. भारतीय संघाचा विद्यमान नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे त्याच्यानंतर भारतीय संघाला नव्या कर्णधाराची गरज असेल. अशात उथप्पाने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी संघाच्या नेतृत्त्वासाठी योग्य व्यक्ती म्हटले आहे. तसेच त्याने वनडे संघाच्या संभाव्य कर्णधारांच्या नावाबद्दलही चर्चा केली आहे.
रोहितच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध बुमराहने (Jasprit Bumrah) भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व (Team India Captaincy) केले होते. भारतीय संघाला त्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि इंग्लंडने पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत सोडवली होती. तरीही उथप्पाला बुमराहची नेतृत्त्व शैली आवडली.
उथप्पा (Robin Uthappa) एका शेअरचॅटच्या ऑडिओ चॅटरूममध्ये म्हणाला की, “बुमराहची इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील रणनिती खूप चांगली होती. त्याची रणनिती रचनात्मक होती. याचमुळे माझी इच्छा आहे की, बुमराहने भविष्यात कसोटी संघाचे नेतृत्त्व करावे. माझ्या हिशोबाने तो कसोटी क्रिकेटमध्ये महान कर्णधार सिद्ध होऊ शकतो.”
वनडे संघाच्या कर्णधारांबद्दल बोलताना उथप्पाने केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांची नावे घेतली. “राहुल किंवा पंत या दोघांपैकी कोणीतरी वनडे संघाची धुरा सांभाळू शकतो,” असे मत उथप्पाने व्यक्त केले आहे.
राहुल सध्या वनडे संघाचा उपकर्णधार आहे. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्त्वही केले होते. परंतु त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ ३-० ने पराभूत झाला होता. तर पंत अजूनही खूप तरुण आहे. परंतु येत्या काही वर्षांत त्याच्याकडे क्रिकेटचा आणखी अनुभव असेल. त्यानेही नुकत्याच दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. ही मालिका २-२ ने बरोबरीत सुटली होती. याखेरीज राहुल आणि पंत दोघेही आयपीएलमध्ये आपापल्या संघाचे नेतृत्त्व करतात. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी निवडकर्त्यांकडे भरपूर वेळ असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा