भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी अष्टपैलू व 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची निवड झाली. ते बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांची जागा घेतील. बिन्नी यांनी यापूर्वी देखील बीसीसीआयमध्ये काम केले आहे. यापूर्वी ते भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सदस्य होते. त्यावेळी आपला मुलगा स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याची संघात निवड होत असताना त्यांनी बैठकीतून बाहेरचा रस्ता धरला होता.
रॉजर बिन्नी हे 2012 ते 2015 या काळात भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सदस्य होते. ते दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करत. याच दरम्यान 2013 च्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार होता. त्या दौऱ्यासाठी भारतीय संघात रॉजर यांचा मुलगा स्टुअर्ट याची निवड झाली. वडील निवड समितीचे सदस्य असल्याने त्यांनी आपले वजन वापरून मुलाला संघात स्थान दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावला गेला. स्टुअर्टने आणि कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. याबाबत रॉजर यांना विचारले असता त्यांनी म्हटले,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ज्यावेळी स्टुअर्टचे नाव चर्चेसाठी आले तेव्हा मी बैठकीतून बाहेर आलो होतो. त्याला निवडण्याचा निर्णय इतर सहा जणांचा होता. त्यावेळी निवडसमिती व्यतिरिक्त संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक देखील आपले मत मांडत असत.”
स्टुअर्ट बिन्नी याने भारतीय संघासाठी 2014 ते 2016 या काळात 5 कसोटी, 14 वनडे व 3 टी20 सामने खेळले. भारतासाठी वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अद्याप त्याच्या नावे आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने केवळ 4 धावा देत 6 बळी मिळवले होते. 2021 मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. नुकताच तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजेंड्स संघासाठी खेळताना दिसला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुलगा क्रिकेटर, तर सुन जगप्रसिद्ध स्पोर्ट्स होस्ट, असा आहे बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचा परिवार
बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले रॉजर बिन्नी पाचवेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर! गांगुलीसह ‘या’ तिघांनी भुषविलंय पद