पॅरीस। फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेत स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर चौथ्या फेरीत पोहचला होता. मात्र, ही फेरी खेळण्यापूर्वीच त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीचा धोका टाळण्यासाठी फेडररने हा मोठा निर्णय घेतला आहे.
फेडररच्या गुडघ्यांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे तो गेल्या वर्षभरापासून संघर्ष करत आहे. तो बरीच महिने या शस्त्रक्रियेमुळे टेनिसपासूनही दूर होता. त्याला फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीतही विजय मिळवताना संघर्ष करावा लागला होता. त्याने डॉमनिक कोफरला ७-६(५), ६-७ (३), ७-६(४), ७-५ असा चार सेटमध्ये पराभूत केले होता. हा सामना जवळपास रात्री १ वाजेपर्यंत चालला होता. या सामन्यानंतर फेडररने त्याच्या तंदुरुस्तीमुळे तो माघार घेऊ शकतो, असे संकेत दिले होते.
अखेर फेडररने रविवारी(६ जून) तो फ्रेंच ओपनमधून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने ट्विट करत म्हटले आहे की ‘माझ्या टीमबरोबर चर्चा केल्यानंतर मी फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुडघ्यांवर झालेल्या २ शस्त्रक्रियेनंतर आणि त्यानंतर १ वर्ष त्यावर काम केल्यानंतर माझ्या शरिराचे ऐकणे आणि या दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर स्वत:वर जास्त दबाव न टाकणे महत्त्वाचे आहे. मला आनंद आहे की मला या स्पर्धेत ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. पुन्हा मैदानावर येण्यासारखा दुसरा आनंद नाही.’
— Roger Federer (@rogerfederer) June 6, 2021
फ्रेंच ओपनमध्ये फेडररची समाधानकारक कामगिरी
फ्रेंच ओपन या स्पर्धेत फेडररला फारसे यश मिळालेले नाही. त्याने आत्तापर्यंत जिंकलेल्या २० ग्रँडस्लॅमपैकी केवळ एकवेळा तो फ्रेंच ओपन जिंकला आहे. त्याने २००९ साली येथे विजेतेपद मिळवले होते.
त्याने आत्तापर्यंत सर्वाधिक ९ वेळा विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर ६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. तसेच ५ वेळा अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. सध्या पुरुष एकेरी गटात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यादीत तो आणि राफेल नदाल संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. नदालनेही २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
फेडरर २ महिन्यांनी म्हणजेच ८ ऑगस्टला ४० वा वाढदिवस साजरा करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी युवीने वाचला भारतीय संघासमोरील अडचणींचा पाढा; म्हणाला…
द ग्रेट लारा! वेस्ट इंडीज दिग्गजाच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीला २७ वर्ष पूर्ण
‘ते’ छायाचित्र पोस्ट करून फसले सौरव गांगुली; चाहत्यांनी ट्रोल करताच हटवली पोस्ट