---Advertisement---

फेडररचा ‘मोठा’ विक्रम! विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा ठरला सर्वात वयस्कर टेनिसपटू 

---Advertisement---

लंडन। सोमवारी(५ जुलै) विम्बल्डन स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विक्रमी १८ व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आठवेळचा विम्बल्डन विजेत्या फेडररने विम्बल्डन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरी गटातील उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या लोरेन्झो सोनेगोचा पराभव केला आणि कारकिर्दीतील एकूण ५८ व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

सहाव्या मानांकित फेडरर आणि तेविसाव्या मानांकित सोनेगोमध्ये २ तास ११ मिनिटे लढत झाली. या लढतीत ७-५, ६-४,६-२ असा फेडररने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. फेडरर हा विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक १८ वेळा उपांत्यपूर्व फेरीत पोहचणारा टेनिसपटू आहे. या यादीत त्याच्यापाठोपाठ जीमी कॉनर्स असून तो १४ वेळ विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळला आहे.

आता फेडररचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना कोणाबरोबर होणार हे मंगळवारी(६ जुलै) डॅनिल मेदवेदेव विरुद्ध हबर्ट यांच्यातील सामन्यानंतर समजेल. सोमवारी पावसामुळे त्यांचा सामना रद्द झाला होता. त्यामुळे आता त्यांचा सामना मंगळवारी होईल. त्यांच्यातील विजेता खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत फेडररशी लढेल. विशेष म्हणजे मेदवेदेव आणि हबर्ट हे दोघेही विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच प्रवेश करण्याचा प्रयत्नात असणार आहेत. यापूर्वी या दोघांनीही विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरी खेळलेली नाही.

फेडरर विरुद्ध सोनेगो मध्ये असा झाला सामना
पुढील महिन्यात वयाची ४० वर्षे पूर्ण करणाऱ्या फेडररने ४६ वेळा जाळीजवळ येऊन शॉट्स खेळत त्यातील ६३ टक्के पाँइंट्स जिंकून सोनेगोला कोर्टवर धावण्यास भाग पाडले होते. पहिल्या सेटमध्ये सोनेगोने फेडररला कडवी लढत दिली. पहिला ५-५ गेमपर्यंत बरोबरीत सुरु होता. पण त्यानंतर पावसाचा २० मिनिटे व्यत्यय आला.

यानंतर मात्र, फेडररने लय पकडली आणि हा सेट ७-५ असा जिंकला. पुढच्या दोन्ही सेटमध्ये फेडररने सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये त्याने सोनेगोला वरचढ होण्याची संधी न देता हे दोन्ही सेट सहज जिंकत सामना खिशात घातला.

उपांत्यपूर्व फेरीत खेळणारा वयस्कर खेळाडू
फेडररने सोमवारी ओपन एरामध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू म्हणून विक्रम नोंदवला आहे. त्याने हा विक्रम केला तेव्हा त्याचे वय ३९ वर्षे ३३७ दिवस होते. यापूर्वी हा विक्रम केन रोसवॉलच्या (३९ वर्षे २२४ दिवस) नावावर होता. त्यांनी १९७४ साली हा विक्रम केला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---