Loading...

भारताच्या क्रिकेट इतिहासात कधीही झाले नाही ते रोहित-पुजाराच्या जोडीने करुन दाखवले

विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी झाली. रोहितने या डावात 127 धावा तर पुजाराने 81 धावांची खेळी केली. त्यामुळे रोहित आणि पुजारा यांनी खास विक्रम केला आहे. 

Loading...

रोहित आणि पुजारा हे दोघे याआधी 2006 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाकडून एकत्र खेळले आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी 2006 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंड विरुद्धही दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची शतकी भागीदारी रचली होती. या सामन्यात रोहितने 59 आणि पुजाराने नाबाद 129 धावा केल्या होत्या.

त्यामुळे 19 वर्षांखालील विश्वचषकात तसेच कसोटी क्रिकेटमध्येही शतकी भागीदारी करणारी रोहित आणि पुजारा यांची पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.

सध्या सुरु असलेल्या भारत दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीत भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील 71 धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा  पाठलाग करताना आज पाचव्या दिवशी पहिल्या सत्राखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 117 धावा केल्या होत्या.

त्याआधी या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपुष्टात आला.

Loading...
You might also like