सर्व संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने असे वक्तव्य केले आहे की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा विचार करत नसल्याचे रोहित शर्माने म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा 113 धावांनी पराभूत झाला. याआधी पहिल्या सामन्यात संघाचा 8 विकेट्सनी पराभव झाला होता. दुसरा सामना गमावल्याने भारताने मालिकाही गमावली. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड संघाने भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची फ्लॉप फलंदाजी हे यजमानांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आपल्या शक्यतांबद्दल वक्तव्य केले. रोहित म्हणाला, “सध्या आमचे लक्ष वानखेडे स्टेडियमवर जाऊन अंतिम कसोटी जिंकण्यावर असेल. सध्या संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा विचार करत नाहीये.” सामन्यातील पराभवाबाबत रोहित म्हणाला, “आम्हाला वानखेडेवर खेळायचे आहे आणि कसोटी जिंकायची आहे. हे सामूहिक अपयश आहे. आव्हान स्वीकारण्यात आमचा संघ अपयशी ठरला.”
न्यूझीलंडकडून सलग दोन सामने गमावल्यानंतर, भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु गुणांच्या टक्केवारीत तोटा झाला आहे. भारत गुणतालिकेत अव्वल आहे. परंतु त्यांच्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियामधील गुणांच्या टक्केवारीतील फरक नगण्य आहे. भारताला आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाचपैकी कमीत कमी दोन सामन्यांत विजय मिळवावा लागेल. तसेच, मुंबई येथील अखेरचा कसोटी सामनाही जिंकावा लागेल.
हेही वाचा –
कसोटी मालिका पराभवास विराट-रोहितसह प्रशिक्षक गंभीरही जबाबदार! जाणून घ्या त्यामागची कारणे
फलंदाजीत पुन्हा फेल ठरल्यानंतर विराटला राग अनावर, बॉक्सवर आपटली बॅट – Video
“प्रत्येक सामना अश्विन आणि जडेजानेच जिंकवला पाहिजे असे नाही”, कर्णधार रोहितकडून अष्टपैलूंची पाठराखण