भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील तिसरा टी२० सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्वतः रोहितने शानदार अर्धशतकी खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत तीन षटकार ठोकत दोन नवे विक्रम आपल्या नावे केले.
रोहितचे सलग दुसरे अर्धशतक
मागील पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार अर्धशतके झळकावणाऱ्या रोहितने आपला तोच फॉर्म कायम ठेवत या सामन्यातही झंझावाती फटकेबाजी करताना टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २६ वे अर्धशतक झळकावले. त्याने सलामीला फलंदाजीला उतरत ३१ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५६ धावा कुटल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १८० इतका जबरदस्त होता. ईश सोढीच्या एका अफलातून झेलामुळे त्याची खेळी संपुष्टात आली.
रोहितच्या नावे दोन विक्रम
रोहितने या सामन्यात तीन गगनचुंबी षटकार ठोकताना टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या नावे आता १५० षटकार जमा झाले आहेत. अशी कामगिरी करणारा मार्टिन गप्टिल नंतरचा तो केवळ दुसरा फलंदाज आहे. यासोबतच, तो टी२० क्रिकेटमध्ये ५० षटकार पूर्ण करणारा तो एमएस धोनीनंतर दुसरा भारतीय कर्णधार आहे. धोनीने सर्वप्रथम कर्णधार म्हणून टी२० क्रिकेटमध्ये ५० षटकार ठोकलेे होते.
भारताने उभारला धावांचा डोंगर
न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी ६९ धावांची सलामी दिली. मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अखेरच्या षटकात दीपक चहरने १९ धावा वसूल करत भारतीय संघाला १८४ पर्यंत मजल मारून दिली. न्यूझीलंडसाठी कर्णधार मिचेल सॅंटनरने सर्वाधिक तीन बळी मिळवले.