शारजाह। मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ८ विकेट्सने मोठा विजय मिळवला. त्याचबरोबर हा सामना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी देखील खास ठरला. त्याने या सामन्यात २ षटकार खेचत मोठा कारनामा केला आहे.
या सामन्यात राजस्थानने मुंबईसमोर अवघ्या ९१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून सलामीला फलंदाजीला उतरलेल्या रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. त्याने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २२ धावांची खेळी केली. त्याने दुसरा षटकार डावाच्या तिसऱ्या षटकात श्रेयस गोपाळविरुद्ध ६९ मीटरवर मारला. त्याचा हा षटकार विक्रमी ठरला.
रोहितने गोपाळविरुद्ध मारलेला षटकार त्याच्या टी२० कारकिर्दीतील ४०० वा षटकार ठरला. यासह टी२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार मारणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी कोणत्याच भारतीयाने असा कारनामा केलेला नव्हता.
त्याचबरोबर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये रोहित ७ व्या क्रमांकावर आहे. ह्या यादीत रोहितने ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचला मागे टाकले आहे. फिंचने टी२० क्रिकेटमध्ये ३९९ षटकार खेचले आहेत. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. गेलने तब्बल १०४२ षटकार टी२० क्रिकेटमध्ये मारले आहेत. १००० हून अधिक षटकार मारणारा तो सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटर
१०४२ षटकार – ख्रिस गेल (४४८ सामने)
७५८ षटकार – कायरन पोलार्ड (५६६ सामने)
५१० षटकार – आंद्रे रसेल (३८२ सामने)
४८५ षटकार – ब्रेंडन मॅक्यूलम (३७० सामने)
४६७ षटकार – शेन वॉटसन (३४३ सामने)
४३४ षटकार – एबी डिविलियर्स (३३७ सामने)
४०० षटकार – रोहित शर्मा (३५५ सामने)
मुंबईचा करो या मरो सामन्यात विजय
राजस्थानविरुद्धचा सामना मुंबई संघासाठी करो या मरो अशा परिस्थितील सामना होता. पण, मुंबईने हा सामना जिंकत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मुंबईचे सध्या गुणतालिकेत ६ विजयांसह १२ गुण झाले आहेत. ते सध्या ५ व्या क्रमांकावर आहेत.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यात वर्चस्व ठेवले. त्यामुळे राजस्थानला २० षटकांत ९ बाद ९० धावाच करता आल्या.
राजस्थानकडून एविन लूईसने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने २० धावांचा टप्पा ओलांडला नाही. मुंबईकडून नॅथन कुल्टर-नाईलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जिमी निशामने ३ विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून रोहित व्यतिरिक्त इशान किशननेही अफलातून कामगिरी केली. त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवने १३ आणि हार्दिक पंड्याने नाबाद ५ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमान आणि चेतन साकारीयाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
बूमबूम इज बॅक! लुईसला तंबूत धाडून युएईत केला मोठा कारनामा