एकीकडे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे भारतीय कसोटी संघ इंग्लंड संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी डरहॅम येथे सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार दुखापतग्रस्त झाला आहे.
मालिकेतून बाहेर होऊ शकतात दोघेही खेळाडू
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या दुखापतीबाबत वैद्यकीय निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “विराट कोहलीच्या पाठीमध्ये वेदना जाणवत होत्या, ज्यामुळे त्याला वैद्यकीय पथकाने तीन दिवसीय सराव सामन्यातून बाहेर राहण्याचा सल्ला दिला आहे. तर, दुसरीकडे उपकर्णधार अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे. हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे त्याला इंजेक्शन देखील घ्यावे लागले आहे.”
जर हे खेळाडू येत्या काही दिवसात फिट झाले नाही तर, भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो. अशातच चाहत्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे की,हे दोघेही खेळाडू मालिका सुरू होण्यापूर्वी पूर्णपणे फिट होतील.
रोहित शर्मा होणार कर्णधार?
इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाहेर झाले तर, रोहित शर्माला संघाचे कर्णधारपद देण्यात येऊ शकते. रोहितने यापूर्वी, भारतीय वनडे आणि टी-२० संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मोठ्या स्पर्धेत देखील विजय मिळवला आहे. जर त्याला कर्णधारपद देण्यात आले तर, पहिल्यांदाच तो भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल.
त्याने सध्या डरहॅममध्ये सुरु असलेल्या सराव सामन्यात विराट आणि रहाणेच्या अनुपस्थितीत भारताच्या संघाचे नेतृत्व केले आहे.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
भावा, करुन दाखवलंस! दीपक चाहरचा विजयी चौकार बहिणीने केला कॅमेऱ्यात कैद; काढले गौरवोद्गार