केंद्र सरकारकडून 25 जानेवारी रोजी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि या सन्मानानंतर ‘हिटमॅन’ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहितने देशासाठी ट्रॉफी जिंकण्याचा आपला प्रयत्न सुरूच राहील, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
पद्मश्री पुरस्कार हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत खास क्षण आहे, असं म्हणत रोहित शर्माने भारत सरकारचे आभार मानले. आपल्या क्रिकेट प्रवासात ज्या प्रशिक्षकांनी, सहकाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी साथ दिली, त्या सर्वांप्रती त्याने कृतज्ञता व्यक्त केली. “देशासाठी खेळणं आणि भारताला ट्रॉफी जिंकवणं हेच माझं स्वप्न राहिलं आहे. हा सन्मान मला आणखी जबाबदारीची जाणीव करून देतो,” असं रोहितने नमूद केलं. दूरदर्शन स्पोर्ट्सने हा व्हिडिओ ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
दरम्यान, रोहित शर्माने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अजूनही वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित खेळणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष लागलं आहे. भारताला वनडे वर्ल्ड कप जिंकवण्याचं स्वप्न रोहित शर्माने कधीही लपवलेलं नाही.
30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे जन्मलेल्या रोहित शर्माने 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्याच वर्षी टी20 क्रिकेटमध्येही त्याने पाऊल ठेवलं, तर 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एंट्री केली. गेल्या 18 वर्षांत रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा एक आधारस्तंभ ठरला आहे.
159 सामन्यांच्या टी 20 करिअरमध्ये रोहित शर्मानं 4231 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 5 शतकं आणि 32 अर्धशतकं केली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 4301 धावा आहेत. कसोटीत त्यानं 12 शतकं आणि 18 अर्धशतकं केली. कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्मानं 7 मे 2025 ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
रोहित शर्मा 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. 2013 मध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, त्या टीमचा रोहित शर्मा सदस्य होता. कॅप्टन म्हणून रोहित शर्मानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली. रोहित शर्मा अजून वनडे क्रिकेटमध्ये खेळतोय. 279 सामन्यामध्ये वनडे करिअरमध्ये रोहित शर्मानं 11516 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर वनडेत 33 शतक आणि 61 अर्धशतकांची नोंद आहे.






