दुबई | इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. या सामन्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने हार्दिक पंड्याने या हंगामात गोलंदाजी न करण्याचं कारण सांगितलं आहे.
हार्दिकची झाली होती शस्त्रक्रिया
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पंड्याची इंग्लंडमध्ये पाठीची शस्त्रक्रिया झाली होती. सन 2018 पासून त्याच्या पाठीच्या खालच्या बाजूला वेदना होत होत्या. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर होता. त्याने आयपीएलच्या 13 व्या हंगामात पुनरागमन केले.
दर तीन ते चार सामन्यात हार्दिकचे केले मूल्यमापन
हार्दिकबद्दल बोलताना रोहित म्हणाला की “सध्या हार्दिक तितक्या सहजपणे गोलंदाजी करू शकत नाही. आम्ही हा निर्णय त्याच्याकडे सोपवला आहे. जेव्हा तो सहजपणे गोलंदाजी करू शकेल, तेव्हा त्याला आनंद होईल. परंतु सध्या त्याला असे वाटत नाही. त्याला काही समस्या आहेत. हार्दिकने गोलंदाजी केली असती, तर बरे झाले असते. परंतु संपूर्ण हंगामात आम्ही त्याला अशा परिस्थितीत ठेवलं आहे की जेणे करून तो त्याच्या शरीराची काळजी घेईल आणि त्याने ते कार्य योग्य प्रकारे पार पडलं. आम्ही दर तीन ते चार सामन्यांत त्याचे मूल्यमापन केले आणि त्याला काय हवे आहे याबद्दल त्याच्याशी चर्चा करतो.”
हार्दिकच्या फलंदाजीमुळे झाला आनंद
हार्दिकचं संघातील महत्व सांगताना रोहित पुढे म्हणाला की, “ज्या खेळाडूकडून आपण काही अपेक्षा करतो आणि तो ते कार्य करू शकत नाही, अशा खेळाडूवर आम्ही दबाव आणू इच्छित नाही. यामुळे त्याचे मनोबल खचून जाते. आम्हाला अशी परिस्थिती नको होती. हार्दिक हा आमच्यासाठी खूप महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याची फलंदाजी आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. जोपर्यंत तो फलंदाजीत योगदान देत आहे तोपर्यंत मी आनंदी आहे.