आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 37 वर्षीय रोहित कर्णधार म्हणून पाचव्या आयसीसी स्पर्धेत भारताचं नेतृत्व करेल. ही स्पर्धा पाकिस्तान आणि युएईत आयोजित केली जाणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळेल.
1996 च्या विश्वचषकानंतर पाकिस्तान प्रथमच एखाद्या आयसीसी स्पर्धेचं आयोजन करणार आहे. मात्र बीसीसीआयनं सुरक्षेचं कारण सांगत पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. यानंतर आयसीसीनं भारताचे सर्व सामने युएईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आता नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानात जाण्यास नकार दिला असला, तरी कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे.
‘क्रिकट्रॅकर’च्या वृत्तानुसार, रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे. हा उद्घाटन समारंभ 16 किंवा 17 फेब्रुवारीला आयोजित होईल. भारतीय कर्णधार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तानात जाणार असल्याचं एका सूत्रानं ‘न्यूज 18’ ला सांगितलं. असं असलं तरी याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रोहित शर्माच्या गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, तो स्पर्धेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रोहितनं 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 सामन्यांत 76च्या सरासरीनं 304 धावा ठोकल्या. यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. भारताला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्कारावा लागला होता.
भारत आणि पाकिस्ताननं अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आपले संघ जाहीर केलेले नाहीत. तत्पूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
हेही वाचा –
हा खेळाडू बनणार होता टीम इंडियाचा ‘पोस्टर बॉय’, आता संघातही जागा मिळेना!
वयाच्या 45 व्या वर्षी या खेळाडूची रोनाल्डोच्या सेलिब्रेशनची कॉपी, पाहा VIDEO
‘हे अविश्वनसनीय आहे….’, आयकॉनिक ऑडी 100 पाहून रवी शास्त्री आठवणींमध्ये हरवले