भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत अनेक मोठ्या आणि आक्रमक खेळी केल्या आहेत. या खेळी करताना त्याने चौकारांबरोबर षटकारांचीही बरसात केली आहे. या लेखात रोहितने एका वनडे सामन्यात ७ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारलेल्या ५ खेळींचा आढावा घेण्यात आला आहे.
रोहितने एका वनडेत मारलेले सर्वाधिक षटकार –
१. विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरु, २०१३ – १६ षटकार
२ नोव्हेंबर २०१३ ला रोहित शर्माने बंगळुरु येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध १५८ चेंडूत २०९ धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने १२ चौकार आणि तब्बल १६ षटकार मारले होत. त्याने ९६ धावा या केवळ षटकार मारुन केल्या होत्या. त्यावेळी तो एका वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला होता. पण त्याच्या या विक्रमाची बरोबरी एबी डिविलियर्सने २०१५ ला केली आणि ओएन मॉर्गनने २०१९ च्या विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध १७ षटकार मारत रोहितचा हा विक्रम मोडला.
२. विरुद्ध श्रीलंका, मोहाली, २०१७ – १२ षटकार
रोहितने १३ डिसेंबर २०१७ ला मोहाली येथे श्रीलंका विरुद्ध झालेल्या वनडेत त्याच्या कारकिर्दीतील तिसरे द्विशतक केले होते. त्याने १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने १३ चौकार आणि १२ षटकार मारले होते. या खेळीनंतर भारताकडून एका वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहितने पहिल्या क्रमांकानंतर दुसरा क्रमांकही मिळवला. यावेळी त्याने एमएस धोनीच्या १० षटकारांचा विक्रम मागे टाकला होता.
३. विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, २०१४ – ९ षटकार
रोहितने १३ नोव्हेंबर २०१४ ला कारकिर्दीतील दुसरे द्विशतक श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे खेळताना केले. त्यावेळी त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६४ धावांची खेळी केली होती.वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती.
रोहितने २६४ धावांपैकी तब्बल १८६ धावा चौकार आणि षटकार मारत केल्या होत्या. असे असले तरी रोहितने त्याच्या अन्य दोन द्विशतकांच्या तुलनेत २६४ धावांची खेळी करताना कमी षटकार मारले होते.
४. विरुद्ध वेस्ट इंडिज, गुवाहाटी २०१८ – ८ षटकार
२१ ऑक्टोबर २०१८ ला रोहितने वेस्ट इंडिज विरुद्ध गुवाहाटी येथे झालेल्या वनडे सामन्यात ११७ चेंडूत नाबाद १५२ धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याने १५ चौकार आणि ८ षटकार मारले होते. पण या सामन्यात १०७ चेंडूत विराट कोहली नाबाद १४० धावा केल्याने सामनावीराचा पुरस्कार विराटने मिळवला होता.
५. विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ, २०१६ – ७ षटकार
१२ जानेवारी २०१६ ला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थला वनडे मालिकेतील पहिला सामना झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून रोहितने १६३ चेंडूत नाबाद १७१ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ७ षटकार आणि १३ चौकार मारले होते.
मात्र या खेळीनंतरही भारताला हा सामना गमवावा लागला होता. ऑस्ट्रेलियाकडून त्यावेळेचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने आणि जॉर्ज बेलीने शतकी खेळी करुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
संबंधित लेख –
– रोहित शर्माचा 37वा वाढदिवस, जाणून घ्या टीम इंडियाच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती? वर्षाला किती रुपये कमावतो ‘हिटमॅन’?
– खेळाडू म्हणून 6 पैकी 6 आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू । HBD Rohit Sharma
– रोहित होता मधल्या फळीतील फलंदाज, ‘या’ सामन्यात मिळाली सलामीला संधी आणि पुढे घडला तो इतिहास… । HDB Rohit