---Advertisement---

रोहित शर्माने कसोटी क्रमवारीत फक्त मोठी झेपच घेतली नाही तर हा विक्रमही केलायं!

On: बुधवार, ऑक्टोबर 23, 2019 3:38 PM
---Advertisement---

जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे काल(22 ऑक्टोबर) भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 3 सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशा फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला आहे.

या मालिकेनंतर आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा सलमीवीर फलंदाज रोहित शर्माने पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.

त्यामुळे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये स्थान मिळवणारा विराट कोहली आणि गौतम गंभीर नंतरचा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.

रोहितने 12 स्थानांची गरुड झेप घेत फलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत 10 वे स्थान मिळवले आहे. त्याने रांची कसोटीत 212 धावांची द्विशतकी खेळी केली होती.

त्याच्याबरोबरच भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान पुन्हा मिळवले आहे. तो आता 4 स्थानांची झेप घेत 5 व्या क्रमांकावर आला आहे. तो याआधी कसोटी क्रमवारीत नोव्हेंबर 2016 मध्ये 5 व्या स्थानावर आला होता. त्याने रांची कसोटीत 116 धावांची शतकी खेळी केली होती.

मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम असला तरी त्याचे या कसोटी क्रमवारीत गुण कमी झाले आहेत. त्याचे 10 गुण कमी झाले असून आता त्याचे 926 गुण आहेत.

त्यामुळे त्याच्यातील आणि 937 गुणांसह अव्वल क्रमांकावर असणाऱ्या स्टिव्ह स्मिथमध्ये 11 गुणांचे अंतर झाले आहे. तसेच भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल 18 व्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम गुण मिळवले आहे. शमी आता 751 गुणांसह 15 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच उमेश यादव 624 गुणांसह 24 व्या क्रमांकावर आला आहे.

तसेच रांची कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या शाहबाज नदीमने कसोटी क्रमवारीत 86 वे स्थान मिळवले आहे. मात्र भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनची 3 स्थानांनी घसरण झाली असून तो आता 10 व्या क्रमांकावर आला आहे.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज जॉर्ज लिंडनेही या कसोटीतून पदार्पण करताना गोलंदाजांच्या यादीत 99 वे स्थान मिळवले आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. डू प्लेसिस आता 11 वरुन 16 व्या स्थानावर तर डीकॉक 10 व्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---