लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून या मालिकेतील चौथा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरु झालेल्या या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे. त्यामुळे त्याचे सध्या खूप कौतुक होत आहे. दरम्यान, त्याच्याबाबतीत या शतकी खेळी दरम्यान एक खास योगायोगही पाहायला मिळाला आहे.
षटकारासह शतक केले पूर्ण
रोहितने भारताकडून दुसऱ्या डावात ६४ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर मोईन अली विरुद्ध षटकार खेचत शतक पूर्ण केले. रोहित शर्माचे हे कसोटी कारकिर्दीतील परदेशात केलेले पहिलेच शतक आहे. त्यातही त्याने ते षटकारासह पूर्ण केले आहे.
षटकार आणि रोहित
रोहितने त्याच्या कारकिर्दीतील परदेशातील पहिले कसोटी शतकच नाही, यापूर्वीही अनेकदा महत्त्वाचे टप्पे षटकारासहच पूर्ण केले आहेत. रोहितने यापूर्वी २ नोव्हेंबर२०१३ रोजी जेव्हा वनडे कारकिर्दीतील पहिले-वहिले द्विशतक पूर्ण केले होते, तेव्हा देखील त्याने ते ऑस्ट्रेलियन गोलंदाज क्लिंटन मॅकेविरुद्ध षटकार मारत पूर्ण केले होते.
तसेच रोहितने ऑक्टोबर २०१९ मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पहिले कसोटी द्विशतक ठोकले होते, तेव्हा तेखील त्याने षटकारासह द्विशतकाला गवसणी घातली होती. त्यावेळी त्याने लुंगी एन्गिडीविरुद्ध षटकार खेचत द्विशतक पूर्ण केले होते.
एवढेच नाही तर रोहितने त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पहिले शतक देखील षटकार मारुनच पूर्ण केले होते. त्याने २ ऑक्टोबर २०१५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना मर्चंट डी लाँग विरुद्ध षटकार खेचत पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक पूर्ण केले होते. ही आकडेवारी पाहिली तर रोहित आणि षटकारांचं खास नातं आहे, असंच म्हणावं लागेल.
https://twitter.com/SonySportsIndia/status/1434161146102050818
रोहितने तिसऱ्यांदा कसोटीत षटकारासह केलं शतक
रोहितने कसोटी कारकिर्दीत षटकारासह शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ होती. त्यामुळे तो कसोटीत सर्वाधिकवेळा षटकारासह शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने हा विक्रम करताना गौतम गंभीर आणि रिषभ पंतला मागे टाकले आहे.
कसोटीत सर्वाधिकवेळा षटकारासह शतक पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत तब्बल ६ वेळा षटकारासह कसोटीत शतक पूर्ण केले आहे. तर गंभीर आणि पंतने प्रत्येकी २ वेळा षटकारासह कसोटीत शतक पूर्ण केले आहे.
रोहितची केएल राहुल, पुजारासह महत्त्वपूर्ण भागीदारी
रोहितने ओव्हल सामन्याच्या दुसऱ्या डावात २५६ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १२७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने केएल राहुलसह (४६) सलामीला ८३ धावांची भागीदारी केली. तसेच दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासह १५३ धावांची भागीदारी केली. पुजारानेही ६१ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताला तिसऱ्या दिवसाखेर ९२ षटकांत ३ बाद २७० धावा करता आल्या आणि १७१ धावांची आघाडी घेता आली.
महत्त्वाच्या बातम्या –
यंदाचे वर्ष रो’हिट’! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय, आता पंतलाही विक्रम करण्याची संधी
कसोटीत षटकारासह सर्वाधिकवेळा शतक करणारा रोहित दुसराच भारतीय, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज
रोहितनं शतकी खेळीसह इंग्लंडमधील गाजवली ७ मैदानं; ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव विदेशी फलंदाज






