इंडियन प्रीमीयर लीग २०२२ साठीच्या लिलावापूर्वी खेळाडू कायम करण्याची प्रक्रिया मंगळवारी (३० नोव्हेंबर) पार पडली. आयपीएल २०२२ साठी खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. त्याआधी स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासून खेळत असलेल्या ८ संघांना प्रत्येकी ४ खेळाडूंना संघात कायम करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई इंडियन्सने देखील त्यांचे ४ खेळाडू संघात कायम केले आहेत. याबद्दल संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएलमधील ५ वेळचे विजेते मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड या ४ खेळाडूंना संघात कायम केले आहे. मात्र, यामुळे हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, इशान किशन अशा अनेक स्टार खेळाडूंना संघातून मुक्त करावे लागले आहे, याबद्दल रोहितने दु:ख व्यक्त केले आहे, पण याचबरोबर त्याने अशीही आशा व्यक्त केली आहे की लिलावातून पुन्हा एक चांगला संघ तयार होईल.
रोहित शर्मा म्हणाला, ‘जसं की आपल्याला माहित आहे की, मुंबई इंडियन्ससाठी हे कठीण रिटेंशन होते. आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आणि बंदूकीसारखे आक्रमक खेळाडू होते. त्यांना संघातून मुक्त करणे, हे हृदय तोडण्यासारखे होते. त्यांनी या फ्रँचायझीसाठी खूप चांगली कामगिरी केली होती आणि खूप आठवणी निर्माण केल्या होत्या. त्यामुळे त्यांना संघातून जाऊ देणे कठीण होते. माझ्यासह चार खेळाडूंना संघात कायम केले असून आाशा आहे की आम्ही आमच्याभवती एक चांगला आणि मजबूत संघ तयार करु.’
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित पुढे म्हणाला, ‘सध्या नजीकचे ध्येय हेच आहे की आम्ही लिलावातून एक चांगला संघ तयार करु शकू. आम्ही लिलावातून कोणाला संघात घेऊ शकतो, यावर आमचे लक्ष असेल. योग्य जागेसाठी योग्य खेळाडूची निवड केली जाईल. आमच्या टॅलेंट हंट टीमने भारतातील आणि भारताबाहेरील चांगल्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवले आहे. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात चांगले प्रतिभाशाली खेळाडू शोधण्याचे चांगले काम केले आहे. आशा आहे की आम्ही चांगले खेळाडू शोधून एक उत्कृष्ट संघ तयार करु शकू.’
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६ कोटींमध्ये, जसप्रीत बुमराहला १२ कोटींमध्ये, सूर्यकुमार यादवला ८ कोटींमध्ये आणि कायरन पोलार्डला ६ कोटींमध्ये संघात कायम केले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सकडे आयपीएल लिलावासाठी एकूण ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं तर! ऍशेसमध्ये यष्टीमागे पेनची जागा घेणार ‘हा’ खेळाडू, कसोटी पदार्णाचीही मिळणार संधी
टी२० नंतर आता विराट कोहली वनडेचेही कर्णधारपद गमावणार? लवकरच घेतला जाणार निर्णय
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स