भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 series) यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशालामध्ये खेळला गेला. भारताने या सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवला आणि विजयी आघाडी घेतली. लखनऊमध्ये खेळळ्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळववा होता आणि हा मालिकेतील संघाचा सलग दुसरा विजय आहे. हा विजय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी खूपच खास ठरला आहे. विजयासह भारतीय संघाने मालिका नावावर तर केलीच, पण सोबतच रोहित शर्माने एका खास विक्रमाची नोंदही केली.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने चांगले प्रदर्शन केले, परंतु रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामीवीर जोडी अपेक्षित धावा करू शकली नाही. रोहित शर्मा अवघ्या २ चेंडूत १ धाव करून बाद झाला. तर ईशान किशनने १६ धावा करून विकेट गमावली. असे असले तरी, भारताने अखेरीस सामना जिंकला आणि रोहित शर्मा मायदेशात स्वतःच्या संघाला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकवून देणार कर्णधार बनला.
रोहित शर्माने भारतात खेळताना आतापर्यंत १७ टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी फक्त एका सामन्यात संघाने पराभव पत्करला आहे, तर उरलेले १६ सामने जिंकले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये इतर कोणताही कर्णधार याबाबतीत सध्या रोहितच्या बरोबरीत नाहीय. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन संयुक्तरित्या आहेत.
मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने मायदेशात १५ टी-२० सामने जिंकले आहेत, तर ९ सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. विलियम्सनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने मायदेशातील १५ टी-२० सामने जिंकले, तर १४ मध्ये संघ पराभूत झाला. विलियम्सन, मॉर्गन आणि रोहित यापूर्वी बरोबरीवर होते, पण आता रोहितने या दोघांना मागे सोडले आहे.
मायदेशात सर्वाधिक टी-२० सामने जिंकवणाऱ्या कर्णधारांमध्ये एरॉन फिंच चौथ्या क्रमांकावर आहे. फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने मायदेशात १४ टी-२० सामने जिंकले, तर ९ सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. भारतीय दिग्गज विराट कोहली, या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. विराटने मायदेशात नेतृत्व केलेल्या सामन्यांपैकी १३ मध्ये भारतीय संघ विजयी ठरला होता, तर ९ सामने संघाने गमावले होते.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या टी-२० सामन्याचा विचार केला, तर भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७४ धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर निवडले गेले. त्यानंतर संजू सॅनसनने ३९ तर रवींद्र जडेजाने ४५ धावांचे महत्वाचे योगदान दिले. खेळाडूंच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर भारताने १७.१ षटकात ३ विकेट्सच्यान नुकसानावर विजय मिळवला. टी-२० मालिकेत भारतीय संघ २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
जिंकलो रे! जड्डू, संजू अन् श्रेयसच्या फलंदाजीसमोर कोलमडली श्रीलंका; ७ विकेट्सने सामना घातला खिशात
‘ही’ खेळाडू असेल आगामी विश्वचषकातील टीम इंडियाची उपकर्णधार, मिताली राजने सांगितले नाव