मेलबर्न येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 विकेट्स विजय मिळवला. त्यांनंतर तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सुरू होईल. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघाशी बुधवारी (30 डिसेंबर) जोडला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यातून तो पुनरागमन करु शकतो. याबद्दल रवि शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित मागील काही दिवसांपासून सिडनी येथे क्वारंटाईन होता. पण बुधवारी त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होणार आहे.
दुसर्या कसोटी सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, तो आनंदी आहे की, तिसर्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाशी जोडला जाईल.
तसेच रोहित शर्माबद्दल बोलताना भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री म्हणाले, संघ व्यवस्थापन त्याला संघाशी जोडण्याअगोदर त्याच्याशी चर्चा करेल आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की, त्याला आता कसे वाटत आहे.
रवि शास्त्री म्हणाले, “तो संघाशी बुधवारी जोडला जाईल आणि आम्ही त्याच्याशी चर्चा करू की, त्याची शारीरिक अवस्था काय आहे, कारण तो मागील दोन आठवड्यापासून क्वारंटाइनमध्ये होता. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की त्याला संघात सामील करण्याअगोदर त्याला कसे वाटत आहे.”
शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार रोहितची मानसिक आणि शारीरिक आरोग्य तपासल्यानंतरच कोणताही ही निर्णय घेतला जाईल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यूएईत झालेल्या तेराव्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते. दरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर रोहित शर्मा भारतात परतला होता.
त्यानंतर तो आपल्या फिटनेसवर काम करण्यासाठी बेंगळुरूला गेला होता. त्याठिकाणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर मेहनत घेतली. त्यामुळे तो भारतीय वनडे आणि टी-20 संघात सहभागी झाला नव्हता. तसेच त्याला दोन कसोटी सामन्यांना सुद्धा मुकावे लागले.
विशेष म्हणजे रोहित शर्माची पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिटनेसच्या कारणाने निवड झाली नव्हती, तेव्हा खूप चर्चा झाली होती. तेव्हा सर्व काही व्यवस्थित नसल्याच्या वावड्या सुद्धा उठल्या होत्या. त्यातच विराट कोहली म्हणाला होता, रोहित शर्माच्या फिटनेस बद्दल त्याला कोणती माहिती नाही.
पण आता बीसीसीआयने स्पष्ट केले की, तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्मा भारतीय संघात सामील होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या १७ व्या वर्षी भारताकडून पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटूचा भाजपात प्रवेश
डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
अटीतटीच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय