रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवत 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. या विजयाचा नायक कर्णधार रोहित शर्मा ठरला आहे, ज्याने 76 धावांची शानदार खेळी करत सामनावीरचा किताब पटकावला आहे.
252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. पहिल्याच षटकापासून आक्रमक अंदाजात खेळत त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 105 धावांची निर्णायक भागीदारी करत रोहितने भारताचा विजयाचा पाया रचला. त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
CAPTAIN ROHIT SHARMA WITH POTM AWARD IN CHAMPIONS TROPHY FINAL ???? pic.twitter.com/ikLL8kzzqB
— Johns. (@CricCrazyJohns) March 9, 2025
भारतीय संघ विजयाच्या मार्गावर असतानाच 19व्या षटकात गिल बाद झाला आणि लगेचच विराट कोहलीही अवघ्या 1 धावांवर माघारी परतला. या दोन झटक्यांमुळे सामना अटीतटीचा झाला, पण रोहितने आपल्या अनुभवाचा वापर करत परिस्थिती सांभाळली. नंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आणि संघाला विजयाच्या जवळ आणले.
श्रेयस अय्यर (48) आणि अक्षर पटेल (29) यांनी संयमी खेळ करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. अखेर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी संयम राखत सामना जिंकला. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत न्यूझीलंडला 251 धावांवर रोखले होते.
या विजयासह रोहित शर्माने एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याआधी भारताने त्याच्या नेतृत्वाखाली 2024 टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे.
सामनावीर म्हणून रोहित शर्मा नावाजला गेला असला तरी हा विजय संपूर्ण भारतीय संघाच्या एकजुटीचे प्रतीक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुन्हा एकदा सिद्ध केले की ते जागतिक क्रिकेटचे खरे बादशाह आहेत.
हेही वाचा-
आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाची विजेतेपदं..! पाहा यादी
टीम इंडियानं उंचावली ट्राॅफी; 25 वर्षांनंतर न्यूझीलंडला चाखवली पराभवाची चव






