भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेश विरुद्ध कानपूर येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रमांची मालिका रचली आहे. टीम इंडियानं पहिल्या डावात तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान संघानं अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले.
यशस्वी जयस्वाल हा सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा भारतीय सलामीवीर ठरला आहे. याशिवाय कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही भारतीय संघानं केला. याच कसोटीत टीम इंडियानं सर्वात जलद शतक ठोकण्याचा स्वत:चा विक्रमही मोडला.
कानपूर कसोटीत भारतीय संघानं बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांत गुंडाळलं. यानंतर टीम इंडिया जेव्हा बॅटिंगसाठी उतरली, तेव्हा त्यांनी अतिशय धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी जोरदार फटकेबाजी सुरू केली. या दोघांनी अवघ्या 3 षटकांत 51 धावा जोडल्या गेल्या. कसोटी क्रिकेटमधील भारताचं हे आतापर्यंतचं सर्वात जलद अर्धशतक आहे.
यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा तुफानी फॉर्ममध्ये दिसला. त्यानं 11 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 23 धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जयस्वालनंही अतिशय वेगवान अर्धशतक झळकावलं. टीम इंडियानं अवघ्या 10.1 षटकात 100 धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील हे आतापर्यंतचं कोणत्याही संघाचं सर्वात जलद शतक आहे. भारतीय संघानं या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडला.
टीम इंडियानं यापूर्वी 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 12.2 षटकांत शतक पूर्ण केलं होते. या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे, ज्यांनी 2011 मध्ये बांगलादेशविरुद्ध 13.1 षटकात शतक पूर्ण केलं होतं.
या सामन्यात टीम इंडियानं षटकारांचा विक्रमही केला. आता भारतीय संघ एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. टीम इंडियानं 2024 मध्ये आतापर्यंत 90 हून अधिक षटकार मारले. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे, ज्यांनी 2022 मध्ये 89 षटकार मारले होते.
हेही वाचा –
राहुल द्रविडच्या मुलाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता
IND vs BAN: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; कानपूर कसोटीत विक्रमांची मालिका…
जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!