भारत विरुद्ध श्रीलंका संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ठोकलेल्या षटकारामुळे स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकाला जखमी केले. चेंडू थेट त्याच्या नाकावर लागला होता. त्यावेळी त्याच्यावर प्रथमोपचारही करण्यात आले होते. मात्र, तरीही त्याच्या नाकातून रक्त येतच होते. यानंतर त्या प्रेक्षकाला रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
झालं असं की, भारताच्या पहिल्या डावातील सहाव्या षटकातील शेवटच्या सहाव्या चेंडूवर रोहितने डिप मिड विकेटच्या दिशेने हा खणखणीत षटकार खेचला होता. हा त्याच्या संपूर्ण खेळीतील एकमेव षटकार (Rohit Sharma’s Six) होता, परंतु त्याच्या या षटकाराने सामना पाहण्यासाठी आलेल्या दर्शकाचे मात्र मोठे (Rohit Sharma Hit Spectator’s Nose) नुकसान केले. रोहितने डिप मिड विकेटला मारलेल्या षटकाराचा चेंडू तिथे असलेल्या दर्शकाच्या नाकावर जाऊन लागला. आणि तो चेंडू इतक्या जोराने लागला की, प्रथमोपचार केल्यानंतरही त्या दर्शकाच्या नाकातून रक्त वाहायचे थांबले नाही.
जखमी झालेल्या प्रेक्षकाचे नाव गौरव विकास परवार असे असून तो २२ वर्षांचा आहे. परिणामी नंतर त्याला बंगळुरूतील हॉसमॅट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्या नाकाचा एक्स-रे काढण्यात आला. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले होते.
जखमी प्रेक्षकाला नेण्यात आले हॉसमॅट रुग्णालयात
वैद्यकीय संचालक आणि हॉसमॅटचे उपाध्यक्ष डॉ. अजित बेनेडिक्ट रायन, सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होते. ते म्हणाले की, त्यांनी प्रथम जखमेवर मलमपट्टी केली आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात पाठवले.
The Rohit Sharma six over deep midwicket hit a spectator’s nose. After first aid, he has been moved to Hosmat Hospital for an X-ray. #INDvsSL #PinkBallTest
— Manuja (@manujaveerappa) March 12, 2022
“मी पॅव्हेलियनच्या मागून सामना पाहत होतो आणि स्टँडमध्ये एका तरुणाला चेंडू लागल्याचे दिसले. त्याला कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या स्वयंसेवकांनी स्टेडियममधील वैद्यकीय कक्षात आणले होते,” असे डॉ. अजित यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
“आम्ही जखमेवर पट्टी बांधली आणि त्याला रुग्णवाहिकेत रुग्णालयात पाठवले. एक्स-रेने नाकाच्या हाडाचे हेअरलाईन फ्रॅक्चर दाखवले, ज्याला शस्त्रक्रियेची गरज नव्हती. तरीही त्याला टाके घालावे लागले. हे टाके एका आठवड्यात काढण्यात येतील,” असेही पुढे बोलताना डॉ. अजित म्हणाले.
प्रेक्षकाची तब्येत आता चांगली असल्याचे त्याच्या भावाने माध्यमांना सांगितले आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने श्रीलंकेचा डाव १०९ धावांत गुंडाळला होता. या डावात रोहित फक्त १५ धावा करून झेलबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! जसप्रीत बुमराहचा मायदेशात डंका; ५ विकेट्स घेत श्रीलंकन फलंदाज धाडलं तंबूत
‘तुझा सार्थ अभिमान’; जसप्रीत बुमराहचा मायदेशात विकेट्सचा पहिला ‘पंचक’, पत्नीने केले रिऍक्ट
‘टोपी सांभाळू शकत नाहीये, संघ कसा सांभाळशील’, रोहित शर्माच्या डोक्यावरून २ वेळा घसरली टोपी