पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोने बुधवारी युवेंटसला नवव्यांदा इटालियन सुपर कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. युवेंटसने अंतिम सामन्यात नापोलीला २-० अशा फरकाने पराभूत केले. यातील पहिला गोल रोनाल्डोने सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला केला होता. त्यानंतर अल्वारो मोराताने इंज्यूरी टाईममध्ये गोल करत युवेंटसचा विजय निश्चित केला. रोनाल्डोने या सामन्यात केलेल्या गोलमुळे एक मोठा विश्वविक्रम केला आहे.
रोनाल्डोचा हा त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीतील ७६० वा गोल होता. त्यामुळे तो व्यावसायिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रो-झेक जोसेफ बीकन यांच्या नावावर होता. त्यांनी ७५९ गोल केले होते. त्यापाठोपाठ या यादीत ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा क्रमांक लागतो. त्यांच्यानावावर अधिकृत ७५७ गोल आहेत.
पेलेंचा दावा तेच सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलपटू –
पेले यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये दावा केला आहे की तेच सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलपटू आहेत. त्यांनी १,२८३ गोल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण याबाबत कोणतीही स्पष्टता नाही की कोणत्या खेळाडूने सर्वाधिक व्यावसायिक गोल केले आहेत. पण सर्वाधिक गोल करण्याच्या अधिकृत यादीत सध्यातरी रोनाल्डो अव्वल क्रमांकावर आहे.
रोनाल्डोने त्याच्या कारकिर्दीत ४५० गोल रिएल मद्रिदकडून खेळताना केले आहेत. तर ११८ गोल त्याने मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना, ८५ गोल युवेंटसकडून आणि ५ गोल स्पोर्टिंग लिब्सनकडून खेळताना केले आहेत. याबरोबरच पोर्तुगालकडून खेळताना त्याने १०२ गोल केले आहेत.
व्यावसायिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलपटू (अधिकृत यादी)
७६० – ख्रिस्तीयानो रोनाल्डो
७५९ – ऑस्ट्रो-झेक जोसेफ बिकान
७५७ – पेले
७४३ – रोमरिओ
७१९ – लिओनेल मेस्सी
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का मलिंगाचा आयपीएलला रामराम, नावावर आहेत एकाहून एक जबरा विक्रम
सुशांत सिंग राजपूत होता धोनीचा कट्टर फॅन, ‘या’ वर्षी पहिल्यांदा काढला होता धोनीबरोबर फोटो