दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २७ धावांनी विजय मिळवत आयपीएल २०२१ स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले. दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने आयपीएल स्पर्धेतील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. फाफ डू प्लेसिसने या डावात ८६ धावांची खेळी केली होती. तर ऋतुराज गायकवाडने ३२ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटकांअखेर ३ बाद १९२ धावा करण्यात यश आले होते.
ऋतुराज गायकवाडचा मोठा कारनामा
या सामन्यात ऋतुराज गायकवाडला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, तो ३२ धावा करत माघारी परतला होता. त्याची आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर त्याने ६३५ धावा केल्या आहेत. दरम्यान आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. तर फाफ डू प्लेसिस तिसरा फलंदाज ठरला आहे. फाफ डू प्लेसिसने या हंगामात ६३३ धावा केल्या आहेत. या यादीत सर्वोच्च स्थानी मायकल हसी आहे. ज्याने २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात ७३३ धावा केल्या होत्या.
आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
७३३ धावा – मायकल हसी (२०१३)
६३५ धावा – ऋतुराज गायकवाड (२०२१)*
६३३ धावा – फाफ डू प्लेसिस (२०२१)
५७२ धावा – मॅथ्यू हेडन (२००९)
५६६ धावा – ड्वेन स्मिथ (२०१४)
महत्त्वाच्या बातम्या –
ऋतु आणि फाफने केले आयपीएल २०२१ वर ‘राज’; विराट-एबीशी केली बरोबरी
स्वप्नभंग! आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात पराभवाला समोरे जावे लागलेले आजपर्यंतचे संघ