ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मंगळवारी आपला नियोजित दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यायांची चाचपणी केली होती. मायदेशात मालिका आयोजित करण्याचाही पर्याय आम्ही सुचवला होता, असे हॉकले म्हणाले.
हा दौरा रद्द करताना ‘स्वास्थ्य आणि सुरक्षा संबंधी जोखीम’ लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला गेल्याचेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. मात्र या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन संघ यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून जवळपास बाद झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नाराजीनंतर स्पष्टीकरण
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द केल्यानंतर दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे निक हॉकले यांना स्पष्टीकरण देणे भाग पडले. ऑस्ट्रेलियन माध्यमातील वृत्तानुसार हॉकले म्हणाले, “आम्ही दक्षिण आफ्रिकेला ही मालिका आमच्या देशात आयोजित करण्याचाही प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी यास नकार दिला. इतर नियोजित वेळापत्रकामुळे आणि विलगीकरणाच्या कठोर नियमांमुळे त्यांनी हा प्रस्ताव नाकारला.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आढावा घेऊ. जेणेकरून ही मालिका आम्ही पुन्हा एकदा आयोजित करू शकू. आम्ही ही मालिका आमच्या देशात आयोजित करण्याचा औपचारिक प्रस्ताव दिला होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने त्याला नकार दिला. त्यांच्या निर्णयाचाही आम्ही आदर करतो.”
दौरा स्थगित करण्याच्या परिणामांबद्दल बोलताना हॉकले म्हणाले, “या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामांची आम्हाला जाणीव आहे. मात्र खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. आम्हाला सगळे नियम माहिती होते आणि त्यामुळेच हा निर्णय घेणे, अवघड होते. आम्ही दौरा शक्य होईल, यासाठी सगळे प्रयत्न केले. मात्र सरतेशेवटी मेडिकल टीमचा सल्ला अंतिम मानण्याचा निर्णय घेतला.”
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ गेममुळे बुमराहच्या समोर खेळण्यासाठी आला आत्मविश्वास, युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा अजब खुलासा
आयपीएलमध्ये खेळताना रोहित शर्माच्या मानधनात कशी झाली वाढ? घ्या जाणून