चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या गट ब मधील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा सात विकेट आणि 20.5 षटके राखून पराभव करत सेमिफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. इंग्लंडसाठी ही स्पर्धा अत्यंत निराशाजनक ठरली असून, संपूर्ण स्पर्धेत त्यांना एका सामन्यातही विजय मिळवता आला नाही.
टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडसाठी अंगलट आला. सुरुवातीपासूनच त्यांचा डाव ढासळला. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. संघाने 38.2 षटकांत सर्व विकेट्स गमावून केवळ 179 धावा केल्या. इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज जो रूट ठरला, ज्याने 37 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर हॅरी ब्रूक (29) आणि बटलर (24) यांनी थोडेसे योगदान दिले, पण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडची फलंदाजी टिकाव धरू शकली नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी संघाला मजबूत सुरुवात करून दिली. मार्को जॅन्सने आपल्या धारदार माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकले आणि 3 विकेट्स घेतल्या. त्याला मुल्डरने चांगली साथ दिली.
179 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळ केला. ज्यात हेनरिक क्लासेन (64) आणि व्हन डूसेन (72*) यांनी शानदार फलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना केवळ 29.1 षटकांत आपल्या नावे केला आणि सेमिफायनलमध्ये प्रवेश केला.
या पराभवासह इंग्लंडचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील आव्हान संपुष्टात आले. संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडच्या संघाने अत्यंत खराब कामगिरी केली. त्यांचा संघ गोलंदाजी आणि फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला.
हेही वाचा-
“रमीझ राजा पुन्हा ट्रोल्सच्या निशाण्यावर, रोनाल्डोच्या आहाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खिल्ली!”
300व्या वनडे सामन्यात धमाकेदार कमगिरी करणारे 3 भारतीय! विराट कोहलीही घालणार धुमाकूळ?
सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित; ‘या’ संघांचा संपला प्रवास