भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. त्यापैकी कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे. सलामीवीर केएल राहुल (kl rahul) याने शतकी खेळी केली.
राहुलने या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २४८ चेंडूंचा सामना केला आणि १२२ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या १७ चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. सध्या तो आणि अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर कायम आहेत. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हे दोघे भारताचा डाव पुढे घेऊन जातील. दरम्यान राहुलने या सामन्यात शतक करून एक अजब कामगिरी देखील नोंदवली आहे.
राहुलने आतापर्यंत सहा देशांमध्ये कसोटी सामने खेळले आहेत आणि प्रत्येक देशात शतक देखील केले आहे. या सामन्यातील शतक करण्यापूर्वी त्याने या सहा पैकी पाच देशात शतक केले होते. दक्षिण अफ्रिकेतील त्याचा हा तिसरा कसोटी सामना आहे आणि त्यामध्ये हे त्याचे पहिले शतक आहे. विदेशात खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये राहुलने इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके केली आहेत.
राहुलने भारतात आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये एक शतकी खेळी केली आहे. इग्लंडमध्ये त्याने ९ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये सर्वाधिक दोन शतके केली आहेत. तर वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याने प्रत्येकी पाच कसोटी सामने खेळले आणि एक-एक शतक केले आहे.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सलामीवीर जोडीने संघाचा चांगली सुरुवात करून दिली. मयंक अगरवाल आणि केएल राहुल या सलामीवीरांनी ११७ धावांची भागीदारी केली. मयंक ६० धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला चेतेश्वर पुजार शून्य धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ३५ धावा करून विकेट गमावली. सध्या केएल राहुल (१२२) आणि अजिंक्य राहणे (४०) मैदानावर कायम आहेत.
भारतीय संघाने पहिल्या दिवशी ९० षटकांमध्ये तीन विकेट्सच्या नुकसानावर २७२ धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या दिवशी गमावलेल्या तिन्ही विकेट्स दक्षिण अफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने एकट्याने घेतल्या. त्याव्यतिरिक्त दक्षिण अफ्रिकेच्या कोणत्याच गोलंदाजाला यश मिळाले नाही.
महत्वाच्या बातम्या –
श्रीसंतची प्रतिक्षा संपणार! ९ वर्षांनंतर करणार ‘त्या’ मानाच्या स्पर्धेत पुनरागमन
दक्षिण आफ्रिका गाजवणाऱ्या ‘टॉप ३’ जोड्यांमध्ये सामील झाले मयंक-राहुल
SAvsIND, Live: सेंच्युरीयन कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व! राहुलचे दमदार शतक
व्हिडिओ पाहा –