-आदित्य गुंड
भारतात सध्या तीन पिढ्या आहेत.
१. ज्यांनी सचिनचा खेळ शेवटी शेवटी पाहिला
२. ज्यांनी सचिनला ऐन भरातल्या वर्षांत पाहिलं
३. ज्यांनी सचिनला अगदी सुरुवातीपासून पाहिलं
एवढं असूनही ह्या तिनही पिढ्यांतील लोकांना सचिन तितकाच आवडतो. एवढ्या मोठ्या समूहाला आपल्या खेळाने वेड लावणे, तेही तब्बल २४ वर्षे सोपं नाही.
सचिनच्या रिटायरमेंटच्या मॅचला माझा एक अमेरिकन सहकारी भारतात होता. त्यावेळी मुंबईत सचिनबद्दल असलेली क्रेझ बघून तो अवाक झाला होता. परत आला तेव्हा
“This guy sure is a legend.”
हे वाक्य आपसूक त्याच्या तोंडातून बाहेर पडल होतं. तेव्हा कुठेतरी सचिनबद्दल आणि स्वतःच्या भारतीय असण्याबद्दल अभिमान वाटला होता.
कुणी त्याच्या स्ट्रेट ड्राईव्हचा फॅन, कुणी त्याच्या अप्पर कटचा फॅन, कुणी स्क्वेअर कटचा फॅन, कुणी नुसताच डेझर्ट स्टॉर्म बघून झालेला फॅन.
‘सचिनला काही बोलायचं नाही’ एवढं आपलेपण लोकांच्या मनात निर्माण केलेला सचिन पहिलाच. एवढं प्रेम जगभरातून मिळालेला सचिन पहिलाच. अलीकडे धोनीला काही प्रमाणात फॅन्स लाभले पण त्याला सचिनची सर नाही.
एरवी कधी बॅटबद्दल विचारही न करणाऱ्या भारतीयांना बॅटलाही प्रायोजक मिळतो हे सचिनमुळे माहीत झालं. कित्येकजण सचिनची बॅट बघून बॅटवर एमआरएफचा स्टिकर लावू लागले. ते अगदी भोसरीतून घेतलेलं साधं लाकडाचं फळकूट असलं तरी. आपला मुलगा तेंडुलकर झाला पाहिजे असं पालकांना वाटायला भाग पाडणारा आणि बाप म्हणतोय म्हणून नाही तर खरंच मला तेंडुलकर व्हायचंय हे मुलांना वाटायला भाग पाडणारा तेंडुलकर हा एकमेव खेळाडू असावा. दोन पिढ्यांची मतं सहसा जुळून येत नाहीत पण सचिनने ते करून दाखवलं म्हणायला हरकत नाही.
त्याची एखादी इनिंग टीव्हीवर लागली तर बाप,बेटा भान हरपून पाहतात असा सचिन एकमेव असावा. ‘क्रिकेटचा देव’ बनून देव या संकल्पनेवर अनेक नास्तिकांना विश्वास ठेवायला भाग पाडणारा सचिनच. तो खेळत असताना अनेक अस्तिकांना मंदिर, मशीद,चर्चमध्ये नवस बोलायला लावणारा सचिनच. हर्षा भोगलेचे समालोचन उत्तमच असते. मात्र केवळ आपल्या फटक्यांनी, आपल्या मैदानावरच्या वागण्याने हर्षाच्या अमोघ वाणीला खुलवणारा सचिनच. अनेक स्फोटक फलंदाज आजूबाजूला असताना वन डे मध्ये डबल सेंच्युरी मारणारा सचिनच. टी२० आपला फॉरमॅट नाही म्हणत बाजूला होणारा मात्र मुंबई इंडियन्सकडून याच फॉरमॅटमध्ये धुरळा उडवणारा सचिनच. कितीही काही झालं तरी मैदानावर डोकं शांतच ठेवायच हा वस्तुपाठ घालून देणारा सचिनच. या बॉलवर सचिन कसा खेळला असता? असा विचार बापाला आणि बेट्याला एकाचवेळी करायला लावणारा सचिनच. नाक्यावरच्या पानवाल्यापासून ते कॉर्पोरेट व्हीपी, डायरेक्टरपर्यंत सगळ्यांना,
“स्कोअर काय झाला? सचिन खेळतोय ना?” असं विचारायला भाग पाडणारा सचिनच.
“त्याने वीस वर्षे देशाचं ओझं आपल्या खांद्यावर वाहिलं आता आम्ही त्याचं ओझं वाहतो” असं कोहलीसारख्या नवख्या खेळाडूंना म्हणायला भाग पाडणारा सचिनच. वर्ल्ड जिंकल्यावर त्याला रडताना पाहून देशाला रडायला लावणारा सचिनच.
आधी ‘सचिनने आता गप्प रिटायर व्हावं’ असं लोकांना म्हणायला लावून रिटायर होताना त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारा सचिनच.
खरंतर तुलना करू नये, पण नाही ओ रहावत नाही. सचिनची सर नाही येणार कुणाला! यासम हाच! त्याच्यासारखा तोच! निवृत्तीनंतर त्याने काय केलं, काय नाही केलं याबाबत मतमतांतरे असली तरी खेळाडू म्हणून तेंडुलकर न आवडणारे नाहीच सापडणार.
अनेक येतील आणि जातील पण सचिनसारखा सचिनच असेल. वर उल्लेख केलेल्या तीन पिढ्या पिढ्यांना सांगत राहतील,
“सचिनला लाईव्ह पाहिलंय.”
‘The legacy remains’ का काय म्हणतात ते हा माणूस शब्दशः खरं करून दाखवतोय.