भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजी पूर्णतः अयशस्वी ठरली आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवाला ऑस्ट्रेलियन फलंदाजीच जबाबदार आहे, अशी टीका अनेक क्रिकेट पंडितांकडून केली जात आहे.अशातच भारताचे माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीमधील काही उणीवा स्पष्ट केल्या आहेत.
एका इंटरव्यू दरम्यान सचिन म्हणाले, “जेव्हा मी वर्तमान ऑस्ट्रेलियन फलंदाजी व मागील काळातील ऑस्ट्रेलियन फलंदाजी यांची तुलना करतो तेव्हा मला स्पष्टपणे जाणवते की भूतकाळातील फलंदाजी क्रम हा जास्त स्थिर होता. त्या काळातील खेळाडू एका वेगळ्या इच्छाशक्तीने मैदानात खेळत होते.”
सचिन यांनी ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंचे उदाहरण देत त्यांचे कौतुक केले आहे. सचिन म्हणाले, “अॅलन बॉर्डर, मार्क टेलर व वॉ बंधू यांच्या काळात ऑस्ट्रेलियन संघ मजबूत होता. तसेच रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन ,ॲडम गिलख्रिस्ट व मायकल क्लार्क यांच्या वेळीही ऑस्ट्रेलियन फलंदाजीमध्ये स्थिरता होती.” सचिन वर्तमान ऑस्ट्रेलियन फलंदाजी बद्दल म्हणाले, “वर्तमान संघांमध्ये असे अनेक फलंदाज आहेत जे चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत .तसेच अनेक फलंदाजांचे अंतिम ११ मधील स्थान देखील निश्चित नाही.”
दरम्यान ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ,अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन होणार आहे. वॉर्नरच्या आगमनाने ऑस्ट्रेलिया संघ अधिक मजबूत असेल, व फलंदाजीत ते उत्तम कामगिरी करतील अशी आशा सर्व ऑस्ट्रेलियन समर्थकांना असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
– काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होतोय, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान