सध्या कोरोना विषाणू पश्चात सुरू झालेल्या क्रिकेट सामन्यांमधे नवीन नियमांचा समावेश झाला आहे. आता विलगीकरणाच्या सक्त नियमावलींसह जैव सुरक्षित वातावरणात सामने खेळविण्यात येतात. अनेक खेळाडूंनी या जाचक नियमांबद्दल तक्रारी देखील केल्या आहेत.
या नियमांसह प्रत्यक्ष खेळातही चेंडूची लकाकी वाढविण्यासाठी लाळेच्या वापराला बंदी घालण्याचा नियम देखील आयसीसीने लागू केला आहे. या नियमाचे पडसाद देखील आता क्रिकेट जगतात उमटत आहेत. नुकतेच भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने देखील या नियमामुळे गोलंदाज प्रभावहीन ठरत असल्याचे वक्तव्य केले आहे.
“गोलंदाज होत आहेत निःशस्त्र”
माध्यमांशी बोलतांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, “गोलंदाजांना चेंडूची चमक वाढविण्यासाठी लाळेचा वापर महत्वाचा असतो. विशेषतः वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग होण्यासाठी ते गरजेचे असते. मात्र आता त्यावर बंदी आल्याने गोलंदाजांच्या भात्यातील महत्त्वाचे अस्त्र कमी झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम कसोटी क्रिकेटवर होणार आहे. खेळ यामुळे फलंदाजांच्या पारड्यात अधिक झुकणार आहे. हा नियम म्हणजे जणू काही फलंदाजांना एखाद्या क्षेत्रात फटका खेळण्याची बंदी घालण्यासारखा आहे.”
गोलंदाज चेंडूला लकाकी येण्यासाठी लाळ आणि घाम, या दोन्ही गोष्टींचा वापर करत असतात. याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाला, “मला असं वाटते की घामापेक्षा लाळेचे महत्त्व अधिक आहे. गोलंदाज ६० टक्के लाळेचा तर ४० टक्के घामाचा उपयोग करत असतात. त्यामुळे या नियमाचा त्यांना नक्कीच फटका बसेल.”
“नवीन रणनिती आखावी लागणार”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टीने बोलताना सचिन म्हणाला, “गोलंदाजांना बळी मिळविण्यासाठी नक्कीच नवीन मार्ग शोधावे लागतील. मर्यादित षटकांच्या सामन्यांतील रणनिती कसोटी सामन्यांमधे लागू होत नाही. त्यामुळे मर्यादित षटकांचे सामने विसरून आता गोलंदाजांना नव्याने तयारी करावी लागेल. कारण मर्यादित षटकांच्या सामन्यांत फलंदाजांना अधिक संधी असतात. मात्र कसोटी सामन्यात फलंदाज असो अथवा गोलंदाज, दोघांनाही समान संधी उपलब्ध होत असतात.”
आयसीसीने कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन लाळेच्या वापराला बंदी घातली असली, तरी गोलंदाजांना त्यांना फटका बसत असल्याचे मत अनेक खेळाडू व्यक्त करत आहेत. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील आयपीएलच्या दरम्यान या नियमामुळे नुकसान होत असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच लाळेचा वापर न केल्यास चेंडू रिव्हर्स स्विंग होणार नाही, असे भाकीतही त्याने वर्तविले होते. या पार्श्वभूमीवर येत्या भारत विरुद्घ ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट मालिकेत गोलंदाजांच्या प्रदर्शनावर सगळ्यांचेच लक्ष असेल.
संबधित बातम्या:
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– अरेरे! कांगारूविरुद्धच्या कसोटी मालिकेत या चार भारतीय खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी
– बचके रेहना इंडिया वालो! कसोटी मालिकेपूर्वी सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला इशारा, म्हणाला