भारत आणि इंग्लंड संघातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेचा आज (५ फेब्रुवारी) श्रीगणेशा होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी रंगणार आहे. अशात चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी सोईस्कर असल्याने भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. परंतु पाहुण्या इंग्लंडकडे जॅक लीच आणि डॉम बेससारखे दमदार फिरकी गोलंदाज उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही संघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार, हे निश्चित आहे. अशात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने जॅक लीचला भारतातील परिस्थितीत यशस्वी होण्याचा आणि भारतीय फलंदाजांना बाद करण्याचा मंत्र सांगितला आहे.
जॅक लीचला करावे लागणार हे काम-
माजी भारतीय फलंदाज सचिन म्हणाला की, “जर जॅक लीचला भारतातील परिस्थितीत यशस्वी व्हायचे असेल; तर त्याला आपल्या गोलंदाजीमध्ये मिश्रण करावे लागेल. मी त्याच्या गोलंदाजीचे फार बारकाईने निरीक्षण केले आहे. तो नेहमी एकाच गतीने गोलंदाजी करतो. जर त्याला खेळपट्टीवर टर्न मिळत असेल; तर चेंडू टाकण्याच्या वेगातही मिश्रण करणे श्रेयस्कर ठरेल. या गोष्टी केल्यास फलंदाजाला स्वत:ला सांभाळण्यास पुरता वेळ मिळत नाही. २०१२ साली मॉन्टी पानेसर आणि ग्रीम स्वान यांनी हीच योजना आखली होती आणि यश मिळवले होते.”
“याबरोबरच मला असे वाटते की, चेन्नईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांची भूमिकाही महत्त्वाची असेल. तसेच रिव्हर्स स्विंग गोलंदाजीही पाहायला मिळेल. माझ्या मते, १५ ते ६० व्या षटकापर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंग होईल. यावेळी फलंदाजांच्या संकटात मात्र भर पडणार आहे,” असे पुढे बोलताना सचिनने सांगितले.
सचिनने सांगितली ९ वर्षांपुर्वींची इंग्लंडची योजना
२०१२-१३ साली इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेत इंग्लंडने २-१ च्या फरकाने भारताला पराभवाची धूळ चारली होती. इंग्लंडचे फिरकीपटू ग्रीम स्वान आणि मॉन्टी पानेसर मालिका विजयाचे नायक ठरले होते.
या कसोटी मालिकेची आठवण काढताना सचिन म्हणाला की, “त्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघ वेगळ्याच अंदाजात दिसून आला होता. ग्रीम स्वानसारखा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक असणारा गोलंदाज त्यांच्याकडे होता. तसेच मॉन्टी पानेसरसारखे गोलंदाज त्यांच्यासोबत होते. पानेसर चेंडूला गती देण्याचा प्रयत्न करत असे. जेणेकरून चेंडू टप्पा खाऊन वेगाने वळण घेत असे. जॅक लीच अगदी याउलट गोलंदाजी करतो. तो चेंडू धिम्या गतीने टाकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! चेन्नई कसोटीपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे पडला बाहेर
हॅप्पी बर्थडे भुवी!! भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल जाणून घ्या १० खास गोष्टी
सलामीवीर-यष्टीरक्षक ठरले; गोलंदाजीची धुरा ‘या’ खेळाडूंकडे, अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग XI